शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ व चाकुर तालुक्यास वरदान ठरलेल्या घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणीलातूरला नेण्याचा घाट घालण्यात आला असून, पाइपलाइन टाकुन पाणी घेऊन जाण्याच्या कामास सुरवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला असल्याने रास्ता रोको, मोर्चा तसेच सामुहिक धरणे आंदोलन करण्यात येत असून, शुक्रवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
शिरूर अनंतपाळ आणि चाकुर तालुक्यातील ४० गावांची तहान भागविणारा तसेच शेतीसाठी वरदान ठरलेल्या घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूर नेण्याचा घाट सुरु आहे. त्यासाठी १०० कोटी रूपयांची पाणी उपसा योजना मंजूर करण्यात आली असून, १२ इंच पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले असून, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर घरणी मध्यम प्रकल्प पाणी बचाव समितीने लातूरला पाणी देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. यासाठी समितीच्या वतीने वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन करण्यात येत आहे. कधी मोर्चा, कधी रास्ता रोको तर नियमितपणे धरणे आंदोलन या पध्दतीने आंदोलक आक्रमक होत आहेत. कोणत्याही पध्दतीने घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूरला नेऊ देणार नाही असा ठाम निर्धार करण्यात आला आहे.
तात्काळ काम थांबविण्याच्या सुचना...तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील तीन दिवसांपासुन सुरू केलेले आंदोलन, धरणे, मोर्चा, रास्ता रोकोस समर्थन देण्यासाठी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन पाईपलाईनचे सुरू असलेले खोदकाम तात्काळ थांबवून अहवाल देण्याच्या सुचना केल्या आहेत. दरम्यान, येथील महात्मा बसवेश्वर चौकात पोलीस चौकीच्या समोर आंदोलकांनी धरणे सुरू ठेवले असून, पाचव्या दिवसी आंदोलन सुरूच आहे. गुरूवारी अन्नत्याग करण्यात आला. तर शुक्रवारी शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.