लातूर : उन्हाळी हंगाम अद्याप संपला नसला तरी पाटबंधारे विभागाने मांजरा प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे रोटेशन थांबविले आहे. उन्हाळी तीन पाळ्या उजव्या आणि डाव्या कालव्यात पाणी सोडल्यानंतर हंगाम तूर्तास बंद करण्यात आला आहे. केवळ आणि केवळ पाऊस लांबल्यामुळे पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मांजरा प्रकल्पावरील २० ते २२ हजार लाभार्थी शेतकऱ्यांनी एका रोटेशनसाठी पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची विनवणी केली आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सिंचनासाठी पाणी बंद करण्यात आले आहे.
मांजरा प्रकल्पाअंतर्गत डावा आणि उजवा कालवा आहे. या दोन्ही कालव्याअंतर्गत २३ हजार ९२३ हेक्टर्स क्षेत्र सिंचनाखाली आहे. उजव्या कालव्याचे क्षेत्र लातूर तालुक्यातील हरंगुळपर्यंत आहे. तर डाव्या कालव्याचे क्षेत्र रेणापूर तालुक्यातील निवाडा पाटीपर्यंत आहे. या दोन कालव्याअंतर्गत २३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. प्रस्तुत उन्हाळ्यामध्ये २० ते २२ हजार शेतकऱ्यांनी तीन रोटेशनचा फायदा पीकक्षेत्र भिजविण्यासाठी घेतला आहे. मात्र आता पावसाळा लांबल्याने पुन्हा रोटेशन नाही, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे.
ऊस वाळतोय, पाणी द्या...तिसऱ्या रोटेशनचा कालावधी संपून दहा ते बारा दिवस उलटले आहेत. त्यातच उन्हाची तीव्रता वाढतच आहे. कॅनॉलच्या पाण्यावर असलेला ऊस दुपार धरत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे एका रोटेशनची मागणी केली आहे. परंतु, पिण्याच्या पाण्याची अडचण नको म्हणून सध्या तरी प्रशासनाने फक्त पिण्याच्या पाण्याचाच विचार केला आहे.
मांजरा प्रकल्पात २१.२४ टक्के जिवंत साठा...मांजरा प्रकल्पामध्ये प्राप्त स्थितीमध्ये २१.२४ टक्के पाणीसाठा आहे. म्हणजे ३७.५९१ दलघमी जिवंत पाणीसाठा असून, एवढे पाणी पिण्यासाठीच वापरायचे असे ठरविले तर एक वर्ष सर्व पाणीपुरवठा योजनांना पुरू शकते. आणखी पावसाळा सुरू झालेला नाही. पाऊस पडणार आहेच, त्यामुळे एक रोटेशन द्यावे, अशी विनंती शेतकऱ्यांची आहे. परंतु, पावसाने ताण दिल्यामुळे सध्या तरी प्रशासनाची सिंचनासाठी नो, अशी भूमिका आहे.
दोन सेंटिमीटरने दररोज घट...मांजरा प्रकल्पात सध्या एकूण ८४.७२१ दलघमी पाणीसाठा आहे. त्यातील मृतसाठा ४७.१३० दलघमी असून, ३७.५९१ जिवंत पाणीसाठा आहे. २१.२४ जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी आहे. बाष्पीभवन, पाणी वापर योजना हे सगळे मिळून दररोज धरणातील पाणी दोन सेंटिमीटरने कमी होत आहे, अशी माहिती शाखा अभियंता सूरज निकम यांनी दिली.