रेणापूर (जि. लातूर) : पैश्याच्या वादातून रेणापुरातील दोघांनी दोन महिलांसह पाच जणांना लोखंडी रॉडने शुक्रवारी सकाळी मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान शनिवारी पहाटे मृत्यू झाला. याप्रकरणी रेणापूर पोलिसांत खुनासह ॲट्रॉसिटी कायद्यानुसार दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
गिरीधारी केशव तपघाले (५०, रा. राजेनगर, रेणापूर) असे मयताचे नाव आहे. रेणापूर पोलिसांनी सांगितले, गिरीधारी तपघाले, त्यांची पत्नी कमल तपघाले हे आपल्या तीन मुलांसह रेणापुरातील राजेनगरात राहतात. ते रोजगार करून आपला उदरनिर्वाह भागवितात. शुक्रवारी सकाळी ७.३० वा.च्या सुमारास आरोपी लक्ष्मण मार्कड व त्याचा भाचा प्रशांत दशरथ वाघमोडे (दोघेही रा. राजेनगर, रेणापूर) हे फिर्यादी कमल तपघाले यांच्या घरी आले. तेव्हा लक्ष्मण मार्कड याने मागील पैशावरुन वाद करण्यास सुरुवात केली. आताच्या आता माझे पैसे दे म्हणून त्याने हातातील लोखंडी रॉडने गिरिधारी तपघाले यांच्या हातावर, दोन्ही पायांच्या मांडीवर मारून जखमी केले. तसेच त्याचा भाचा प्रशांत वाघमोडे यानेही हातातील काठीने गिरीधारी यास मारहाण केली.
तेव्हा फिर्यादीच्या सासू कुलुबाई तपघाले ह्या भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांच्याही पाठीवर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. तसेच फिर्यादी कमल ह्या माझ्या नवऱ्यास का मारहाण करीत आहात, असे म्हणताच यांना आरोपींनी लोखंडी रॉडने हाताच्या खुब्यावर मारहाण करून जखमी केले. तसेच अश्लिल भाषेत जातीवाचक शिविगाळ करीत जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.
दरम्यान, फिर्यादीचा मुलगा मुले सचिन, ऋतिक, योगेश व पुतण्या रवि यांनाही बाजारपेठेत आराेपीने शिवीगाळ करून मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. या सर्व जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच व कमल तपघाले यांच्या फिर्यादीवरून सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम, पोलिस निरीक्षक दीपक शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आरोपी लक्ष्मण मार्कड व त्याचा भाचा प्रशांत वाघमोडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये व ॲट्रॉसिटीचा गुन्हा शुक्रवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.
दरम्यान, शनिवारी पहाटे गंभीर गिरीधारी केशव तपघाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे शनिवारी सकाळी दोन्ही आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम, पोनि. दीपक शिंदे, पोलिस कर्मचारी अभिजित थोरात हे करीत आहेत.