औसा (जि. लातूर) : औसा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा दोन वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे पुरस्कार जाहीर झालेल्या ५६ शिक्षकांना गौरवाची प्रतीक्षा लागली आहे. तालुक्यातील शिक्षकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
दरवर्षी पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून दोन अशा १४ केंद्रांतील २८ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. मात्र, कोविडच्या प्रादुर्भावाच्या अगोदरपासून पुरस्कार वितरणासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांत उत्सुकता नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय हेवेदावे, मानपान अशा विविध कारणांमुळे वर्षअखेरीस पुरस्कार वितरण होते. परंतु, मागील दोन वर्षांत काही कारणास्तव शिक्षकांचा गौरव सोहळा झाला नाही. त्यामुळे पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांमध्ये असलेली आतुरता कमी झाल्याचे पहावयास मिळत आहे.
प्रस्ताव सादर करणाऱ्या शिक्षकांतही नाराजी पसरली आहे. सुरुवातीस कोविडच्या निर्बंधामुळे आणि त्यानंतर पुरस्कार वितरणासाठी आवश्यक निधी पंचायत समितीकडून उपलब्ध झाला नसल्याने सन्मान सोहळा झाला नाही. यंदा तिन्ही वर्षाचे पुरस्कार वितरण सोहळा एकत्र घेतला जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी यांनी सांगितले. दरम्यान, अधिकारी व पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारणाचा फटका शिक्षकांना बसल्याचे ऐकावयास मिळत आहे.
पुरस्कारासाठी बैठकही झाली होती...सन २०२१- २२ या वर्षातील तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणासंदर्भात झालेल्या बैठकीत निधीची विशेष तरतूद केली. तसेच तत्कालीन पदाधिकारी व सदस्यांनी स्वच्छेने ५ ते १० हजार देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार नियोजन ठरले. शिक्षक संघटनांनीही होकार दिला. शिक्षकांची निवड झाली. दरम्यान, अधिकाऱ्यांनी निधी नसल्याचे सांगितले. मात्र, ते चुकीचे आहे. आजही सभेच्या प्रोसिंडिंग बुकमध्ये त्याचा उल्लेख दिसेल, असे भाजपाचे तत्कालिन गटनेते दीपक चाबुकस्वार व माजी उपसभापती रेखा नागराळे यांनी सांगितले.
पुरस्कारामुळे शिक्षकांना प्रोत्साहन...शिक्षकदिनी अथवा सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाला वेगळे महत्त्व आहे. पुरस्कारामुळे शिक्षकांना आणखीन काम करण्याची उर्जा, प्रोत्साहन मिळते. शिक्षकांच्या कामाचा गौरव वेळेवर झाल्यास त्याला महत्त्व राहते. तीन- तीन वर्षे पुरस्कार न मिळाल्याने इच्छुक शिक्षकही नाउमेद होतात, असे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिवलिंग नागापुरे यांनी सांगितले.