लातूर : गत काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमांतून धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समाेर आले आहे. स्टेटस, व्हिडीओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने कारवाई केली जात आहे. परिणामी, लातूर पोलिसांनी ‘सोशल मीडिया’तील घटना, घडामाेडीवर वाॅच ठेवला आहे.
पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सोशल मीडियाचा वापरताना दक्षता बाळण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. सोशल मीडियातून पसरवण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची खात्री करून घ्यावी. पोलिसांची अशावर कायम नजर असून, सर्व परिस्थिती हाताळण्यास पाेलिस सक्षम आहेत. सायबर क्राईम सेल सोशल मीडियातील विविध साइटवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोशल मीडिया पेट्रोलिंगमुळे गुन्हे दाखल केले जात आहेत. गत चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात ४ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिस अधीक्षकांच्या सूचना...सोशल मीडियाच्या माध्यमांतून पसरवण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची यूझर्सनी सर्वप्रथम खात्री करण्याची गरज आहे. जुन्या वादग्रस्त घटनांचा काहीजण फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. ते सोशल मीडियातून निराधार, खोट्या अफवा पसरवत आहेत. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्याची खरी गरज आहे. त्यांच्याकडून प्रक्षोभक, समाजमन दुखावलं जाईल, अशा पाेस्ट व्हायरल हाेणार नाहीत, याची काळजी घ्यावी. सोशल मीडियाचा वापर प्रत्येकांनी जबाबदारीने करावा. तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट व्हायरल करू नका. कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देताना संयम बाळगावा, प्रत्युत्तर देताना शब्द जपून वापरावेत.
तरुणांकडे लक्ष देण्याची गरज...सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रकरणी गुन्हे दाखल केलेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश जण १९ ते ३० वयोगटांतील तरुण आहेत. काही कारणामुळे हे तरुण अशा चुकीच्या पोस्ट व्हायरल करत आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर अशा मुलांना त्यांच्या कृतीचा नंतर पश्चाताप होतो. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. यासाठी पालकांनीही मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.