शिरूर अनंतपाळ : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी चार तासच सुरु आहेत. परिणामी, बाजारपेठेत कोथिंबिरीचे दर घसरल्याने लागवडीचा खर्चही पदरी पडत नसल्याने शिरूर अनंतपाळ येथील एका शेतकऱ्याने कोथिंबिरीच्या उभ्या पिकात शेळ्या- मेंढ्या सोडल्या आहेत.
शिरूर अनंतपाळ येथील शेतकरी किरण ब्रह्मेचा यांनी उन्हाळ्यात कोथिंबिरीला चांगला भाव मिळेल, म्हणून राज्यमार्गाशेजारील एक एकर शेतीमध्ये धन्याची पेरणी केली होती. एप्रिलच्या अखेरीस कोथिंबिरीला चांगला भाव मिळेल, या आशेने त्यांनी रात्रीभर जागरण करून पिकास खत, पाणी दिले. चांगली देखभाल झाल्याने कोथिंबिरीचे पीकही जोमात आले. परंतु, कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले.
सकाळी ७ ते ११ या वेळेतच भाजीपाला बाजार सुरू ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत कोथिंबिरीचे भाव घसरले आहेत. ठोक खरेदीसाठी व्यापारी धजावत नाहीत. त्यामुळे किरण ब्रम्हेचा यांनी कोथिंबिरीच्या उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडल्या आहेत. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे.
५० हजारांचा खर्च...
एक एकर कोथिंबिरीची लागवड करण्यासाठी ब्रम्हेचा यांनी खत, पाणी, बियाणे आदी बाबींवर ५० हजार रुपये खर्च केले होते. परंतु त्यातून ५ हजारही पदरी पडत नसल्याने त्यांनी कोथिंबिरीच्या उभ्या पिकात चारण्यासाठी शेळ्या- मेंढ्या सोडल्या आहेत.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे शेत- शिवारातील चारा वाळला आहे. जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत. अशा परिस्थितीत मेंढपाळांना शेळ्या-मेंढ्यानां घेऊन भटकंती करावी लागत आहे. भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना हिरव्यागार कोथिंबिरीचा चारा मिळाला आहे. ब्रम्हेचा यांचे नुकसान झाले असले तरी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना चांगलाच आधार मिळाला आहे.