लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : क्रीडा संघटनेतील वाद हे काही नवे नाहीत. स्वत:च्या स्वार्थासाठी व खुर्चीच्या हव्यासापोटी संघटक खेळाडूंचे हित जतन करत नाहीत. त्यामुळे याचा फटका डायरेक्ट त्या खेळावर व खेळाडूंवर होतो. मात्र, याचे त्यांना काही देणे-घेणे नाही. अशीच अवस्था गेल्या काही वर्षांत अनेक खेळांची झाली आहे. त्यामुळे खेळाडू बुचकळ्यात पडले आहेत. एकाच खेळाच्या दोन-दोन संघटना असल्याने खेळाडूंवर अन्याय होत आहे. मात्र, याचे देणे-घेणे कोणासही नाही.
अनेक खेळांच्या राष्ट्रीय व राज्य संघटनेत दुफळी आहे. या दोन्ही स्तरांवर एकेका खेळाच्या दोन-दोन संघटना कार्यरत आहेत. या दोन्ही संघटनेमार्फत स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन होते. मात्र, या दुफळीमुळे खेळाडूंचे अतोनात नुकसान होत आहे. खेळाडूंनाही कोणत्या संघटनेकडून खेळावे हा प्रश्न पडला आहे. ही बाब गेल्या अनेक वर्षांपासून घडत आहे. मात्र, संघटनेमधील समेट काही घडेना. राज्य सरकारच्या क्रीडा खात्यानेही यामध्ये लक्ष घातले होते. मात्र, आजतागायत त्यास यश आले नाही. या दुफळीमुळे खेळाडूंची अवस्था तळ्यात-मळ्यात झाली आहे. खेळाडूंनाही कोणाकडून खेळावे, हे सुचेना. त्यामुळे त्यांचीही गोची झाली आहे. क्रीडा ग्रेस गुण, आरक्षण यासह विविध लाभांपासून खेळाडू वंचित राहत आहेत. काही दिवसांपूर्वीच कयाकिंग, कनोईंग, तायक्वांदो व व्हाॅलिबाॅलच्या राज्य संघटनांवर कारवाई केली होती. मात्र, तरीही क्रीडा संघटनांचे सुधारण्याचे नाव नाही.
एकंदरित, या सर्व बाबींचा फटका खेळाडूंवर होत आहे. विविध गटांच्या स्पर्धेसह खुल्या गटातही एकाच खेळाच्या जिल्ह्यापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत दोन्ही गटांकडून स्पर्धा होत आहेत. त्यात मात्र खेळाडू भरडले जात आहेत. खेळ कसा वाढावा, खेळाडू कसे वाढावेत, स्पर्धेत कसा उत्तम संघ जाईल, यासह सराव शिबिर व खेळ विकासाच्या अन्य बाबींकडे लक्ष द्यायचे सोडून क्रीडा संघटक आपलीच पोळी भाजत आहेत. त्यामुळे क्रीडाक्षेत्राची हानी होत आहे. एकंदरित, खेळातील वाद मिटवून खेळ पुढे जावा, यासाठी खेळाडू आस लावून आहेत.
क्रीडा संघटकांनी खेळाडूंचे हित जोपासणे गरजेचे आहे. खेळ वाढीसाठी प्रयत्न करण्याचे सोडून आपापसांत मतभेद करणे चुकीचे आहे. यामुळे खेळ वाढीवर याचा परिणाम होतो. खेळाडूंमुळेच आपण आहोत, याचे भान न विसरता प्रयत्न करून आपसांतील वाद मिटवावेत, असे ऑलिम्पियन मुष्ठीयोद्धा शाहूराज बिराजदार म्हणाले.
संघटनेतील वादामुळे खेळाडूंची मानसिक स्थिती बिघडत आहे. कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हावे, याचेही कोडे आहे. दोन संघटना असल्याने पेच आहे. दोन्ही संघटना आम्हीच खरे असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे अडचण होते. आपसांतील वाद मिटवून खेळाडूंना न्याय द्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय व्हाॅलिबाॅलपटू मुजम्मील शेख याने व्यक्त केली.
व्हाॅलीबाॅल खेळात दोन-दोन स्पर्धा
क्रीडा संघटनेच्या माध्यमातून कोरोनानंतर स्पर्धेला सुरुवात झाली आहे. व्हाॅलिबाॅल खेळातही दोन संघटना आहेत. नुकत्याच या माध्यमातून सबज्युनिअर, ज्युनिअर व युथ या वयोगटांसाठी निवड चाचणी झाली असून, दोन्ही गटांच्या राज्य स्पर्धा या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे या खेळाचे खेळाडू संभ्रमात आहेत.
वेट्रन्स स्पर्धेतही दोन संघटना
ज्येष्ठ खेळाडूंसाठी घेण्यात येणाऱ्या वेट्रन्स स्पर्धेतही दोन संघटना कार्यरत झाल्या आहेत. एका संघटनेची स्पर्धा नाशिकला तर दुसऱ्या संघटनेची स्पर्धा अहमदनगर येथे होणार आहे.या संघटनेतही दुफळी झाल्याने ज्येष्ठ खेळाडू कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हावे, यासाठी बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती ज्येष्ठ खेळाडूंनाही अनुभवावी लागत आहे.