ऑनलाइन लोकमतकिल्लारी, दि. ५ : किल्लारी येथील एका सराफा दाम्पत्याने सोमवारी मध्यरात्री अॅसिड प्राशन केल्याची घटना घडली़ या दोघाही दाम्पत्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले़ मात्र उपचारापूर्वीच पतीचा मृत्यू झाला़ तर पत्नीची प्रकृती अत्यवस्थ असून, ती मृत्युशी झुंज देत आहे़ औसा तालुक्यातील किल्लारी येथील अजित उत्तम पोतदार (५४) यांचे किल्लारीवाडी येथे वडिलोपार्जित सोन्या-चांदीचे दुकान आहे़ सोमवारी ते दिवसभर दुकानात होते़ दिवसभर दुकानातील व्यवहार केल्यानंतर ते सायंकाळी घराकडे गेले़ सोमवारी मध्यरात्री अजित पोतदार व त्यांच्या पत्नी संजीवनी पोतदार यांनी अॅसिड प्राशन केले़ त्यांच्या खोलीतून नातेवाईकांना व्हिवळण्याचा आवाज आला़ दरम्यान, नातेवाईकांनी खोलीचे दार ठोठाऊन पाहिले़ मात्र प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे दार तोडून नातेवाईकांनी आत प्रवेश केला असता हे दोघेही जमिनीवर अत्यवस्थ स्थितीत आढळले़ त्यांच्या शेजारी अॅसिडची बॉटलही होती़ त्यामुळे नातेवाईकांनी तात्काळ या दोघांना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास लातूरच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ मात्र सराफा व्यापारी अजित पोतदार यांना तेथील डॉक्टरांनी मयत असल्याचे घोषित केले तर त्यांची पत्नी संजीवनी पोतदार यांच्यावर उपचार सुरू केले़ त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्या मृत्युशी झुंज देत आहेत़ या प्रकरणी किल्लारी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे़ पोतदार यांच्या पश्चात आई, वडील, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे़ दरम्यान, मयत अजित पोतदार यांच्या पार्थिवावर किल्लारी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले़ कर्जबाजारीपणामुळे अॅसिड प्राशऩ़़अजित पोतदार यांना चार एकर जमीन असून, त्यांच्यावर उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे ८ लाख आणि मातोळा येथील हनुमान पतसंस्थेचेही १ लाख ९ हजारांचे कर्ज आहे़ या कर्जामुळे पोतदार दाम्पत्यांनी अॅसिड प्राशन केले असावे, अशी चर्चा किल्लारीवाडीत होती़ दरम्यान, तलाठी गवळी यांनी केलेल्या पंचनाम्यातही कर्ज असल्याचा उल्लेख केला आहे़
अॅसिड प्राशन करून सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या
By admin | Published: July 05, 2016 8:08 PM