शहरातील थोडगा रोड, तळेगाव रोड, टेंभुर्णी रस्ता, अंबाजोगाई रोड या रस्त्यांवर भल्या पहाटे फिरणा-यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असून त्यात बहुतांशजण विनामास्क असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन शनिवारी पहाटे अहमदपूर पोलीस स्टेशन ठाण्याच्या वतीने गुड मॉर्निंग मोहिम राबविण्यात आली. विनामास्क फिरणाऱ्या २७ जणांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.
ही मोहीम पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात आली. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, पोलीस हवालदार भास्कर सूर्यवंशी, रमेश आलापुरे, सुहास बेंबडे, सखाराम भिसे, कैलास चौधरी, परमेश्वर भरकडे, अविनाश श्रीसागर, गोपाल कावळे, नारायण बेंबडे, हनुमंत माने, खय्युम शेख, तसेच पालिकेचे माधव पानपट्टे, प्रकाश जाधव हे सहभागी झाले होते.
शनिवारी सकाळपासूनच संपूर्ण व्यापारपेठ बंद होती. भाजीपाला, फळे विक्री तसेच मेडिकल दुकाने वगळता किराणा दुकानेही बंद होती. मात्र दुचाकी वाहनांची ये- जा वाढली होती. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस ठाणे, पालिका व महसूल प्रशासनाच्या वतीने विनाकारण दुचाकीवर फिरणारे तसेच जिल्हाबंदी असतानाही लातूर, नांदेड, परभणीकडे जाणा-या चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.
तीन ठिकाणी तपासणी नाके....
वैद्यकीय कारणांव्यतिरिक्त इतर अशा ४६ वाहनांवर पालिकेने दंडात्मक कारवाई करून २३ हजारांचा दंड वसूल केला. तसेच ५ वाहनांवर मोटारवाहन कायद्यानुसार कार्यवाही करून ५ हजारांचा दंड आकारण्यात आला. ही सर्व वाहने अहमदपूर आगारात लावण्यात आली आहेत. जिल्हाबंदी संबंधी लातूर- नांदेड रोडवरील सांगवी फाटा, अहमदपूर- अंबाजोगाई रोडवरील दगडवाडी पाटी, अहमदपूर- मुखेड रोडवरील टोल नाका या ठिकाणी आंतरजिल्हा प्रवासी वाहनांची तपासणी नाके तयार करून प्रवासी वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, किनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बंकटवाड आदींनी सहकार्य केले.
दंड भरण्यास पैसे नसल्याने अडचण...
पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्यांना पोलीस आणि पालिकेच्या पथकाने थांबवून चौकशी करीत दंड आकारला. तेव्हा बहुतांश व्यक्तींकडे दंड भरण्यासाठी पैसेही नव्हते. त्यामुळे त्यांच्यापुढे मोठी अडचण निर्माण झाली होती. घरातील मंडळींना फोन करुन काही जणांनी पैसे मागवून दंड भरला. या दंडासंदर्भात कुटुंबातील व्यक्तींना व्यवस्थित सांगता येत नसल्याचे पहावयास मिळाले.