राजकुमार जाेंधळे, लातूर: शहरात सतत हाणामाऱ्या, गुंडगिरी करत सार्वजिनक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाची लातूरचे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अदेशानुसार थेट एक वर्षासाठी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शिवाजीनगर पाेलिस ठाण्याच्या वतीने झाेपडपट्टी दादा कायद्यानुसार (एमपीडीए) हा प्रस्ताव पाठविण्यात आला हाेता. या प्रस्तावाला जिल्हादंडाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.
लातुरातील शिवाजीनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत दादाेजी काेंडदेव परिसरात राहणाऱ्या अजिंक्य निळकंठ मुळे (वय २७) याच्या विराेधात शरीरास इजा निर्माण हाेईल अशा प्रकारचे कृत्य केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी वृत्तीमुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा, येथील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला हाेता. दरम्यान, याच्या विराेधात शिवाजीनगर पाेलिसांनी झाेपडपट्टी दादा कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी मंजुरी दिली आहे. आता त्याची एक वर्षासाठी थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
काय आहे एमपीडीए कायदा..?
झाेपडपट्टी दादा कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई झाल्यास, संबंधित गुन्हेगाराला न्यायालयात जाता येत नाही. त्याची एक वर्षासाठी थेट कारागृहात रवानगी केली जाते. या कायद्यानुसार कारवाई झाली तर सराईत, अट्टल गुन्हेगारांच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यात यश येते. शिवाय, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण हाेण्याला मदत हाेते. -साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर.
लातूर शहरातील ही दुसरी कारवाई
झाेपडपट्टी दादा कायद्यानुसार (एमपीडीए) एमआयडीसी हद्दीत वास्तव्याला असलेल्या आकाश हाेदाडे नामक गुन्हेगारावर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली आहे. सध्या ताे कारागृहात आहे, अशी माहिती शिवाजीनगर ठाण्याचे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी दिली.
विविध ठाण्यात १७ गुन्हे दाखल
सराईत गुन्हेगार अजिंक्य मुळे याच्याविराेधात लातूरसह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे १७ गुन्हे दाखल आहेत. यात खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी उकळणे, मालमत्तेचे नुकसान, जबरी चाेरी, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव गाेळा करुन दहशत निर्माण करणे, घातक शस्त्र वापरणे, चाेरी करणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.