जळकोट : जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. गुरुवारी तिसऱ्या दिवशी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शहरातून रॅली काढून सरकारवर संताप व्यक्त केला.
रॅलीस शहरातील बाजार समितीपासून सुरुवात झाली. ती गुरुदत्त विद्यालय, हनुमान मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक, महात्मा बसवेश्वर चौक मार्गे पंचायत समिती येथे पोहोचली. यावेळी आंदोलनकर्त्यांची भाषणे झाली.
ही रॅली सहायक प्रशासन अधिकारी एच. जी. गिरी, शिवराज एम्पल्ले, शिक्षक समन्वय समितीचे प्रकाश मरतुळे, शिक्षक सेनेचे विजय तेलंग, जुनी पेन्शन संघटनेचे माधव होनराव, नवनाथ जाधव, ग्रामसेवक संघटनेचे डी. व्ही. कबाडे, पशुधन पर्यवेक्षक डी. बी. लोकरे, एस. डी. फुले, तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेचे अनिल उमाटे, आरोग्य संघटनेचे एस. एस. कोकरे, आय. जे. गोलंदाज यांच्या नेतृत्वाखाली निघाली. यावेळी पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अहमद पठाण, प्रेमदास राठोड, पोकॉ. विजय जाधव, राहुल वडारे यांनी बंदोबस्त ठेवला होता.