सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 04:22 AM2018-01-20T04:22:23+5:302018-01-20T04:22:38+5:30
राज्य सरकार घोषणांच्या पलिकडे काहीच करीत नाही. कुठल्याही शेतमालाला आधारभूत किंमत दिली जात नाही.
लातूर : राज्य सरकार घोषणांच्या पलिकडे काहीच करीत नाही. कुठल्याही शेतमालाला आधारभूत किंमत दिली जात नाही. एकंदरित, या सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचे जिल्ह्यात शुक्रवारी आगमन झाले. अजित पवार म्हणाले, कापसाला भाव नाही. बोंडअळीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. शेतक-यांकडील कापूस संपल्यानंतर भाव वाढले. त्याचा फायदा व्यापाºयांना होत आहे. कर्जमाफीची घोषणा झाली. पण त्याचा प्रत्यक्ष लाभ होताना दिसून येत नाही. ज्या शेतक-यांनी कर्जाची वेळेवर परतफेड केली, त्यांना जाहीर करण्यात आलेले २५ हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळत नाही.
राठोड कुटुंबाला लाखाची मदत...
औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील शेतकरी शहाजी राठोड यांना कृषी पंपाचे ६० हजारांचे बिल देण्यात आले होते. त्यांनी महावितरणच्या कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. हे कुटुंब पिठाची गिरणी चालवून उदरनिर्वाह करते. या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना एक लाखाची मदत देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा दंगलीचा मास्टरमाइंड कोण?
१ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचा मास्टरमाइंड शोधण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही. या घटनेतून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, मास्टरमाइंड कोण आहे, असा सवालही पवार यांनी केला़