उदगीर : लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी उदगीरचे आमदार व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी महामहिम राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेवून केली आहे.
तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या उदगीर शहराला ऐतिहासिक वारसा असून, जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून उदगीरचे नाव आहे. व्यापारी व शैक्षणिकदृष्ट्या उदगीर शहर हे परिपूर्ण असून, उदगीर जिल्हा व्हावा म्हणून विविध प्रकारची आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी मागील अनेक वर्षापासून असल्याने यावेळी नवीन जिल्हा निर्मितीची घोषणा करताना उदगीरचा समावेश व्हावा याबाबत चर्चा करून या मागणीचे निवेदन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
तसेच उदगीर मतदार संघात मराठा समाजाच्या मुला मुलींची संख्या जास्त आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या नावे ग्रामपंचायतपर्यंत लागू होणारी शासनाची ध्येय उद्दिष्टपूर्ण योजना राज्यात लागू करावी, संस्कार देण्याचे काम करणाऱ्या कीर्तनकार मंडळींना मानधन देण्यात यावे यासह विविध विषयावर यावेळी महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी जेष्ठ कीर्तनकार शिवराज नावंदे गुरुजी, भाजपचे प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे, जळकोट काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव कुणाल बागबंदे उपस्थित होते.