लातूर : जन्मत: अंधत्व, हृदयविकार, मेंदूज्वर अशा आजारांवर प्रतिबंध करण्यासाठी गोवर-रुबेला लस महत्त्वाची आहे. जिल्ह्यात तीन दिवसांत ६९ हजार ३३९ बालकांना ही लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली.
डॉ. ढगे म्हणाले, राज्य शासनाने ही लस प्रथमच राज्यात सुरू केली आहे. यापूर्वी केंद्र सरकार, आरोग्य संघटनांनी देशातील १९ राज्यांत गोवर-रुबेला लस ९ महिने ते १५ वर्षे वयोगटांतील मुलांना दिली आहे. त्याच धर्तीवर राज्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. काही समाजातील पालकांमध्ये लसीसंदर्भात गैरसमज होता. मात्र तो दूर करण्यात आला आहे. त्यामुळे या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गोवर हा बालकांमध्ये होणारा अत्यंत संक्रमक व घातक आजार आहे. त्यामुळे न्यूमोनिया, मेंदूज्वर, अंधत्व, कुपोषण असे गुंतागुंतीचे आजार होतात. त्याचबरोबर रुबेला हा आजार विषाणूजन्यू मुले, प्रौढांमध्ये होणारा असला तरी गरोदर मातेस झाल्यास गर्भपात, बाळाचा उपजत मृत्यू होऊ शकतो. तसेच या आजारामुळे जन्मत: अंधत्व, बहिरेपणा, हृदयविकार, लहान मेंदू, मतिमंदपणा असे आजार उद्भवू शकतात.
खाजगीमध्ये हजारापर्यंत लस...गोवर-रुबेला लस ही खाजगी दवाखान्यात हजार रुपयापर्यंत आहे. बालक आजारी असल्यास त्या कालावधीत लस देऊ नये. लसीकरणानंतर अंग खाजणे, पुरळ येणे, ताप भरणे, डोकेदुखी-अंगदुखी असे जाणवू शकते. त्यामुळे काळजी करू नये. तात्काळ डॉक्टरांना दाखवावे, असे डॉ. ढगे म्हणाले.