लातूर : जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यापैकी २५ ग्रामपंचायती बिनविराेध आल्या आहेत. जिल्ह्यात १ हजार ४५९ केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी ८ हजार ७५४ मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, यापैकी कोणाचीच कोरोना चाचणी झाली नसल्याचे चित्र आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७ हजार २८६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये ३ हजार ७१ पुरुष तर ४ हजार २१५ महिला उमेदवार आहेत. निवडणूक विभागाच्या वतीने १ हजार ४५९ मतदान केंद्र तयार करण्यात आली असून ८ हजार ७५४ मनुष्यबळ नियुक्त केले आहे. यामध्ये १४१ निवडणूक निर्णय अधिकारी असून ११६ क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर ३७ राखीव कर्मचारी राहणार आहेत. निवडणूक विभागाच्या वतीने मतदानाचे नियोजन करण्यात आले असून प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. मात्र, जिल्ह्यात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या झाल्या नसल्याने प्रशासनाने सदरील चाचण्यांना बगल दिल्याचे सध्यातरी चित्र आहे.
जिल्ह्यात ११६ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची निवड
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात ११६ क्षेत्रीय अधिकारी, १४१ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ३७ जण राखीव आहेत. १४५९ केंद्रावर मतदान होणार असून यामध्ये लातूर २३२, रेणापूर ८६, औसा १७४, निलंगा १८०, शिरूर अनंतपाळ २२९, देवणी १०८, उदगीर २२५, जळकोट ८४, अहमदपूर १५५ तर चाकूर तालुक्यातील १०२ मतदान केंद्रांचा समावेश आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी नियुक्त
निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी नियुक्त राहणार असून प्रत्येक मतदाराची थर्मल स्क्रिनिंग केली जाणार आहे. तसेच मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोज, फेसशिल्ड आदी साहित्य पुरविले जाणार आहे. तसेच १४ जानेवारी रोजी मतदान साहित्य वितरित करताना संबंधित मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांची स्क्रिनिंग केली जाणार असून, गरज पडल्यास रॅपिड ॲन्टीजेन चाचणी केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.