गाव पुढाऱ्यांची मोर्चेबांधणी
लातूर : जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने गाव पुढाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यातच महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरु असल्याने ग्रामीण राजकारण यंदाच्या निवडणुकीत चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यात नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्स्थाच्या निवडणुकीतही एकत्र लढण्याचा प्रयोग केला जाईल, अशी चर्चा आहे. लातूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या ४०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत हा प्रयोग राबविला जाईल का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदार संघापैकी ४ विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे तर दोन मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. विधानसभेतील हे पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था सर्वाधिक भाजपाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व भाजप असे पॅनल आमने-सामने आले तर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होईल, हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र सध्या गावपुढाऱ्यांची पॅनल उभे करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असा आहे पक्षीय दबदबा...
चाकूर, देवणी, निलंगा, शिरुर अनंतपाळ पंचायत समिती व नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात आहेत. लातूर जिल्हा परिषदही भाजपाच्या ताब्यात असून, लातूर मनपा मात्र काँग्रेसकडे आहे. जळकोट पं.स. काँग्रेस आणि नगरपंचायत भाजपाकडे. उदगीर पंचायत समिती राष्ट्रवादीकडे तर नगर परिषद भाजपाकडे आहे. औसा नगर परिषद राष्ट्रवादीकडे, तर पं.स. काँग्रेसकडे आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे बळ
स्थानिक स्वराज्य संस्था भाजपाच्या ताब्यात सर्वाधिक आहेत. त्याखालोखाल काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे या संस्था आहेत. शिवसेनेचे या संस्थामध्ये काही सदस्य आहेत. त्यामुळे होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत पॅनलद्वारे लढल्या तर निश्चित महाविकास आघाडीचे बळ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र लढत चुरशीची होईल, असे चित्र दिसत आहे.