लातूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्यावतीने सोमवारपासून काम बंद करीत जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानासाठी लागू केलेली वसुलीची अट पूर्णपणे रद्द करण्यात यावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनातील १० ऑगस्ट २०२० पासून ते मार्च २०२२ पर्यंतची थकित फरकाची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. ग्रामपंचायत कर्मचारी हे सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार, वीज पुरवठा कामगार, कर वसुली कर्मचारी, लिपिक अशा विविध काम करीत आहेत. मात्र, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे.
हे प्रश्न निकाली काढावेत म्हणून सोमवारपासून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. २९ फेब्रुवारीपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस दयानंद येरंडे, मराठवाडा अध्यक्ष नवनाथ नरवडे, जिल्हाध्यक्ष सतीश मस्के, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद लोभे, सचिव किशोर मस्ने, सहसचिव मंगेश जाधव आदी सहभागी झाले आहेत.