लातूर : नमुना ८ अ चा उतारा मागितला असता ग्रामसेवकाने ग्रामपंचायतचा मालमत्ता कर भरण्यास सांगितले, यावरून संतापलेल्या ग्रामस्थाने उदगीर तालुक्यातील तोंडचिर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकास मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. याबाबत ग्रामसेवकांनी दिलेल्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा गावातील एकाविरुद्ध नोंद करण्यात आला आहे.
ग्रामसेवक अवकाश गणपती पवार हे तोंडचिर ग्रामपंचायत कार्यालयात बसले होते. दरम्यान, बालाजी सोपान जोतिकोळी हे नमुना नं. ८ अ चा उतारा मागण्यासाठी आले होते. दरम्यान, ग्रामसेवक अवकाश पवार यांनी मालमत्ता कर भरा, लागलीच ८ अ चा उतारा देतो असे म्हटले. त्यावर बालाजी जोतिकोळे यांनी तू नोकरी कशी करतोस, बघून घेतो म्हणून शिविगाळ केली. शासकीय कामात अडथळा केला. शिवाय, जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद अवकाश पवार यांनी उदगीर ग्रामीण पोलिसात दिली. त्यावरून बालाजी सोपान जोतिकोळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोनि. तारु हे करीत आहेत.