लातूर : रोहयोअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरीचा प्रस्ताव पंचायत समिती चाकूर येथे दाखल केल्याचा मोबदला व पुढे विहिर मंजूर होण्यासाठीच्या कामात मदत करण्यासाठी बोथी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक परशुराम पंढरी गायकवाड (वय ५०) यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे आरोपी ग्रामसेवक यापूर्वीही एका प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकले होते.
चाकूर तालुक्यातील बोथी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक परशुराम पंढरी गायकवाड यांनी अहिल्यादेवी सिंचन विहीरीचा प्रस्ताव पंचायत समिती चाकुर येथे दाखल केल्याचा मोबदला तसेच यापुढे सिंचन विहीर मंजुर होण्यासाठीच्या कामात मदत करण्यासाठी म्हणून एका शेतकऱ्याकडे ३ हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार सोमवारी लातूर येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे करण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने २० जून रोजी एसीबीने लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, ग्रामसेवक परशुराम गायकवाड यांनी तकारदारास पंचासमक्ष ३ हजार रूपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
ग्रामसेवक गायकवाड यांनी मागणी केलेले ३ हजार रूपये घेऊन तक्रारदार चाकूर येथील बसस्थानकाच्या कॅन्टीनमध्ये सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास गेले असता गायकवाड यांनी स्वत: पंचासमक्ष ही रक्कम स्विकारली. त्यावेळी त्यांना लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले. तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून ग्रामसेवक परशुराम गायकवाड यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाचा तपास एसीबीचे पोलीस उपाधीक्षक पंडीत रेजितवाड करीत आहेत.
यांनी लावला सापळा...
एसीबीकडे तक्रार प्राप्त झाल्यावर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपाधीक्षक पंडीत रेजितवाड, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर यांनी सापळा लावला. कारवाईत पोहे. फारूक दामटे, भागवत कठारे, शाम गिरी, भिमराव आलुरे, संतोष गिरी, शिवशंकर कच्छवे, रूपाली भोसले संदीप जाधव, मंगेश कोंडरे, गजानन जाधव, संतोष क्षीरसागर यांचा सहभाग होता.