उदगीर : तालुक्यात पार पडलेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत प्रस्थापितांना धक्का बसला आहे. तर नवख्यांना संधी मिळाली आहे. बहुचर्चित असलेल्या मलकापूर ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती व मलकापूर ग्राम पंचायतीचे उपसरपंच मुन्ना पाटील यांचा या निवडणूकीत पराभव झाला. गुरुनाथ बिरादार यांना मलकापूर ग्राम पंचायतीच्या सरपंचपदासाठी ग्रामस्थांनी विजयी केले आहे.
नावंदी ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत पं. स. चे माजी सभापती ब्रम्हाजी केंद्रे यांच्या पॅनलचे वर्चस्व राहिले आहे. देवर्जन ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत जि. प. चे माजी सदस्य चंद्रप्रकाश खटके यांच्या पॅनलचा पराभव झाला. अभिजित चंद्रप्रकाश साकोळकर यांच्या पॅनलचे वर्चस्व राहिले आहे. तर शंभूउमरगा ग्राम पंचायतीत विद्यमान सरपंच वसंत पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले असून, मोघा ग्रा. पं. च्या निवडणूकीत प्रमोद काळोजी, रावणगावमध्ये ज्ञानेश्वर पाटील, तोगरी मध्ये रवी काळा, तोंडचिरमध्ये मदन पाटील यांच्या पॅनलचे वर्चस्व राहिले आहे.
उदगीर तालुक्यात २६ ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी विजयी झालेले उमेदवारांमध्ये सुकणी आशा जाधव, मोर्तळवाडी प्रभाकर पाटील, चिमाचीवाडी मीरा दुर्गावाड, तिवटग्याळ प्रशांत पाटील, हैबतपूर अनुराधा नरहरे, शेकापूर उर्मिला शेळके, देवर्जन चंद्रप्रकाश साकोळकर, वायगाव काशीबाई कांबळे, सताळा बु. कुसुमबाई तिरकोळे, शंभुउमरगा लिंगेश्वर स्वामी, डिग्रस चंद्रशेन ढगे, मोघा शीलाबाई काळोजी, तोगरी अश्विनी गुरुस्थळे, रावणगाव लक्ष्मीबाई पाटील, तोंडचिर सुनीता पाटील, सोमनाथपूर अंबिका पवार, तोंडार भरत कोचेवाड, कल्लूर लक्ष्मण कुंडगीर, उमरगामन्ना सावित्रीबाई सलगरे, मलकापूर गुरुनाथ बिरादार, नेत्रगाव हेमलता पाटील, बनशेळकी नरसिंग शेळके, नावंदी ब्रम्हाजी केंद्रे, देऊळवाडी शुभम केंद्रे, नागलगाव सुभाष राठोड, चोंडी विठ्ठलराव पाटील यांचा समावेश आहे.
दरम्यान सकाळी १० वाजता येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणीस सुरुवात झाली. सर्वच ग्रामपंचायतीचे निकाल देपारी १२ वाजेपर्यंत जाहीर झाले. विजयी उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुलालाची उधळण करीत व फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करत गावापर्यंत पोहोचले. गावागावांतून विजयी मिरवणूका काढून आनंदोत्सव साजरा केला.
सताळा बु. निवडणूकीची तक्रार फेटाळली...तालुक्यातील सताळा ग्राम पंचायतीच्या झालेल्या निवडणूकीत मतमोजणी करताना एका गटाच्या एजंटास हजर राहता आले नाही. तत्पूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल घोषित केल्याची तक्रार केली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती तक्रार फेटाळून लावली. तहसीलदार रामेश्वर गोरे व निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली २६ ग्राम पंचायतीच्या निवडणूका शांततेत पार पडल्या.