औसा तालुक्यातील देवताळा येथील रहिवासी आणि भिवंडी येथे पोलीस म्हणून कार्यरत असलेले सतीश शिवाजी चव्हाण (३१) यांच्या दुचाकीला शनिवारी मध्यरात्री मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील मानकोली भिवंडी येथे एका वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती देवताळा येथील त्यांचे आजोबा हरिबा चव्हाण (८५) यांना रविवारी सायंकाळी कळताच त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. दरम्यान, आजोबांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले तर नातू असलेल्या सतीश चव्हाण यांच्यावर आज सोमवारी सकाळी देवताळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. मयत पोलीस सतीश चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामदास चव्हाण, जि. प. सदस्य शालिनी चव्हाण, सरपंच प्रदीप चव्हाण, भादा पोलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक संदीप भारती, बापूसाहेब मंतलवाड, अनंत चव्हाण यांच्यासह भिवंडी येथील पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
नातवाच्या मृत्यूची माहिती मिळताच आजोबांनी सोडले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:16 AM