- हरी मोकाशे (लातूर)अपेक्षित मजुरी देऊनही वेळेवर मजूर मिळत नसल्याने त्यावर उपाय म्हणून निलंगा तालुक्यातील सावरी येथील राम शिवाजीराव अंचुळे यांनी ट्रॅक्टरच्या उसात सरी सोडण्याच्या यंत्रातच ऊस लागवड यंत्र तयार केले आहे़ त्यामुळे वेळ व ऊस लागवडीच्या खर्चातही बचत झाली आहे़
सावरी येथील राम अंचुळे यांचे शिक्षण पदव्युत्तरपर्यंत झाले आहे. कुटुंबास ८२ एकर शेती असून, चुलत्यासह संपूर्ण कुटुंब एकत्र आहे़ त्यामुळे अंचुळे यांनी आपले लक्ष शेतीकडे केंद्रित केले़ एवढी जमीन कसण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नसल्याने त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला़ नगदी पीक असलेल्या उसाची लागवड करण्यास सुरुवात केली़ अगोदर ट्रॅक्टरच्या साह्याने सरी सोडून ऊस लागवड केली जात होती. परंतु मजूर टंचाई जाणवत असल्याने त्यावर तोडगा काढून त्यांनी स्वत: २०१७ मध्ये कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून ट्रॅक्टरच्या साह्याने सरी सोडण्याच्या यंत्रास प्लास्टिकचा पाईप जोडून ऊस लागवड यंत्र तयार केले़ उसाच्या बेण्यासाठी सरी यंत्रावरच प्लास्टिकचे बॅरल अर्धे कापून जोडले आहे़ त्यासाठी त्यावर केवळ दीड हजार रुपये खर्च झाला
या पाईपमधून उसाचे बेणे सोडल्यानंतर ते मातीत पडते आणि त्यानंतर त्यावर माती झाकली जाते़ हे यंत्र बनविण्यासाठी त्यांना केवळ दीड हजार रुपये खर्च आला. तसेच मनुष्यबळात मोठी बचत झाली असून, या कामासाठी केवळ एका मजुराची गरज आहे़ एक एकर ऊस लागवडीसाठी जवळपास साडेचार हजारांपेक्षा जास्त खर्च होतो़ या यंत्रामुळे लागवडीसाठी केवळ ७०० रुपये खर्च येत असल्याचे राम अंचुळे यांनी सांगितले़ तसेच अंचुळे यांनी २००४ मध्ये ट्रॅक्टरच्या मोगडा यंत्रास पाच फणी पेरणी यंत्र बनविले आहे़ त्यामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा अशा पिकांची पेरणी सहजपणे करता येते, असेही अंचुळे म्हणाले.