लातूर : सहा महिन्यांपासून अविरत सेवा देणाऱ्या डॉक्टरांना पाठबळ देण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले १,६०० तज्ज्ञ डॉक्टर्स राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात पंधरा दिवसांत रुजू होतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली़
डॉक्टर्स आणि कर्मचारी सुटी वा रजेशिवाय कोविड-१९ चा उपचार करीत करीत आहेत़ यंत्रणेवर ताण आहे़ त्यात काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न वैद्यकीय शिक्षण विभाग करीत असून पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा निकाल लागल्याबरोबर येणाऱ्या पंधरा दिवसांत विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टर्स गरजेनुसार बहुतांश जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होतील़, असे त्यांनी सांगितले.
आॅक्सिजन तुटवड्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख म्हणाले, पूर्वी ८० टक्के उद्योगाला व २० टक्के वैद्यकीय क्षेत्राला पुरवठा होत होता़ ते सूत्र यापूर्वीच बदलले असून आता ८० टक्के पुरवठा आरोग्य क्षेत्राला होतो़ कोविडविरुद्ध लढा देताना आपण अनेक नव्या गोष्टी शिकलो, बदल केला आणि व्यवस्था निर्माण केली आहे़ राज्यात वाढलेल्या प्रयोगशाळा, मुबलक प्रमाणात पीपीई कीट, मास्क व औषधी हे जसे साध्य केले तसे आता लवकरच आॅक्सिजनबाबतही धोरणात्मक निर्णय घेतला जात आहे़ सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयातच आॅक्सिजन प्रकल्प उभारणे विचाराधीन आहे़ सद्य:स्थितीत आॅक्सिजन उत्पादन दुपटीने वाढविण्याचे निर्देश दिले आहेत़ दरम्यान, आॅक्सिजनची साठेबाजी व चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी दिला़