चापोली : चाकूर तालुक्यातील चापोलीसह परिसरातील काही शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. मात्र, भाव एकदम घसरल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. ठोक किरकोळ बाजारात केवळ १० ते १५ रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.
बाजारपेठेत दररोज शेतीमालाचे दर घसरत आहेत. परिणामी, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रारंभी ५ ते ६ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर पोहोचले होते. पंधरवड्यात ९०० ते ११०० रुपयांपर्यंत गडगडले. या दरात शेतकऱ्यांचा तोडणीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे.
चापोलीसह परिसरातील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत मिरचीची लागवड केली आहे. उन्हाळ्यात मिरचीने शेतकऱ्यांना फायदा झाला. चांगला भाव मिळतो म्हणून मे महिन्यात काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून मिरचीची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी जून महिन्यात पाऊस झाल्याने मिरची लागवड केली, परंतु सध्याच्या स्थितीला नांदेड, निजामाबाद भागात मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक वाढल्याने मिरचीचे दर घसरून त्याचा फटका जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
किलोस अंदाजे २२ रुपये खर्च...
मिरची रोप लागवडीपासून ते तोडणीपर्यंत शेतकऱ्याला २२ ते २४ रुपये प्रति किलोपर्यंत अंदाजित खर्च येतो. यात तोडणी मजूर मिळत नाहीत आणि मिळालेच तर सध्या एक किलो मिरची तोडण्यासाठी ६ रुपये मजुरी घेतली जाते. बाजारात मिरचीला १० ते १५ रुपये किलो भाव आहे. तोडणी आणि वाहतूक खर्चाएवढाच भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
उत्पादनापेक्षा खर्च अधिक...
चापोली येथील बाजारात १५ रुपये किलो दराने हिरवी मिरची मिळत होती. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी २० रुपये किलो उत्पादन खर्च लागतो. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे, असे येथील मिरची उत्पादक शेतकरी रमाकांत स्वामी यांनी सांगितले.
नुकसान कमी करण्याचा प्रयत्न...
भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या दराने शेतमाल विक्री करावा लागत आहे. तो विक्री न झाल्यास टाकून द्यावा लागेल. जो दर मिळेल, त्यातून किमान नुकसान कमी होईल, असे येथील मिरची उत्पादक शेतकरी गंगाधर बावगे यांनी सांगितले.