लातूर : घरफाेडीतील दाेन फरार आराेपींना पंधरा वर्षानंतर माेठ्या शिताफीने लातुरातील गांधी चाैक ठाण्याच्या पथकाने अहमदपूर येथून गुरुवारी अटक केली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, एजाज आझम सय्यद आणि आतिक आझम सय्यद (दाेघेही रा. खाटीक गल्ली, ह.मु. निजामुद्दीन कॉलनी, अहमदपूर) असे अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत.
पाेलिसांनी सांगितले की, लातुरात गांधी चाैक ठाण्यात घरफाेडीप्रकरणी पंधरा वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, गुन्हा घडल्यापासून आराेपी पाेलिसांना गुंगारा देत हाेते. पाेलिस त्यांच्या अटकेसाठी मागावर हाेते. मात्र, ते हाती लागत नव्हते. ९ सप्टेंबर २००९ राेजी पहाटे सिद्धार्थ सोसायटी नांदेड रोड, लातूर येथे एका घरात चाेरट्यांनी खिडकीतून प्रवेश केला. घरातील दुचाकी, घड्याळ आणि माेबाइल असा मुद्देमाल चाेरून नेला हाेता. दरम्यान, यामधील तीन आराेपींपैकी दोन आरोपी अहमदपूर शहरात असल्याची माहिती गांधी चाैक ठाण्याचे पाेलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून त्यांनी तातडीने आपल्या पथकाला आराेपीच्या अटकेसाठी सूचना केल्या. ‘ऑलआऊट ऑपरेशन’ दरम्यान अहमदपूर येथून एजाज आझम सय्यद आणि आतिक आझम सय्यद या दाेघांना अटक करण्यात आली.
याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गांधी चाैक ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दत्तात्रय शिंदे, संपत कांदे, दयानंद सारोळे, शिवराज भाडोळे यांच्या पथकाने केली.