कासार बालकुंदा : जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या बेमुदत संपात निलंगा तालुक्यातील देवी हल्लाळीतील तिन्ही शिक्षक सहभागी झाल्याने पाच दिवसांपासून शाळेचे कुलूप उघडले नाही. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून गावच्या सरपंचांनी पुढाकार घेऊन गावातील पदवीधर युवकांना एकत्रित केले. या युवकांनी सोमवारी शाळेचे वर्ग घेत अध्यापनाचे कार्य केले.
निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर देवी हल्लाळी येथे जिल्हा परिषदेची केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळेची पटसंख्या ८८ असून अध्यापनासाठी एक मुख्याध्यापक आणि दोन शिक्षक आहेत. १४ मार्चपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात गावातील तिन्ही शिक्षक सहभागी झाले आहेत. त्यामुळे शाळा बंद आहे. गावातील विद्यार्थी शाळेत येतात. परंतु शिक्षक नसल्याने मैदानावर बसून जातात. पाच दिवसांपासून वर्गच भरत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सरपंच लक्ष्मण गिरी यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी शालेय व्यवस्थापन समितीशी चर्चा करून रविवारी गावातील पदवीधर युवकांची बैठक घेतली आणि वर्ग भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी गावातील पदवीधर युवकांनी वर्ग घेत अध्यापनाचे कार्य केले.
व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी हातात घेतला खडू...शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवराज हावशेट्टे हे माजी शिक्षक असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळपासून पूर्णवेळ शाळा झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे शाळा भरल्याचा अनुभव आला. यावेळी सरपंच लक्ष्मण गिरी, अविनाश शिंगाडे, गणेश उस्तुरे, ऋतुजा बिरादार, संगमेश स्वामी, राधा मुळे यांनी अध्यापनाचे कार्य केले.
गावकऱ्यांची मदत...गावातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावकऱ्यांच्या सहकार्याने साेमवारपासून वर्ग भरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालकांतूनही समाधान व्यक्त होत आहे.- लक्ष्मण गिरी, सरपंच.
तिघेही संपावर...देवी हल्लाळी शाळेत आम्ही तीन शिक्षक असून, तिघेही संपावर आहोत. त्यामुळे शाळा बंद आहे. साेमवारी गावकऱ्यांनी शाळा भरविल्याचे समजले.- ए. व्ही. मरेवार, मुख्याध्यापक.