राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील एमआयडीसीत गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर लातूर पाेलिसांनी पुन्हा एकदा छापा मारून तब्बल ४४ लाखांवर मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात पाचजणांविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर येथील अतिरिक्त एमआयडीसी परिसरात गत आठवड्यात गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर पाेलिस पथकाने धाड टाकून काेट्यवधींचा गुटखा, गुटखा बनविण्याचे साहित्य जप्त केले होते. एमआयडीसी परिसरात गुटखा तयार करून ताे विक्री केला जात असल्याची माहिती बखऱ्याने पाेलिसांना दिली. या माहितीच्या आधारे अतिरिक्त एमआयडीसीतील राहुल कोल्ड्रिंक्सच्यास गोदामावर शुक्रवारी पाेलिस पथकाने छापा मारला. यावेळी शासनाने बंदी घातलेला गुटखा आणि ताे निर्मिती करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ४४ लाख २२ हजार ६७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात पाचजणांविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पाेलीस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, लातूर शहर उपविभागीय पाेलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. डी. नरवाडे, पो.उप.नि. कराड, सहायक फौजदार जगताप, हवालदार पिस्तुलकर, देशमुख, भोसले, गाडे, दळवे, चालक जाधव यांच्या पथकाने केली.