लातूर: गत अनेक दिवसांपासून लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत चाेरट्या मार्गाने गुटखा विक्री आणि साठा सुरू आहे. यातील गुटखा किंगला लातूरच्या जिल्हा पाेलीस अधीक्षकांनी दणका दिला आहे. शनिवार आणि रविवार असे सलग दाेन दिवस सुरू असलेल्या धाडसत्रात तब्बल १ काेटी २५ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. यातील तीन आराेपी फरार झाले असून, पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत. या घटनेने लातुरातील गुटखा किंगचे धाबे दणाणले आहेत. आतापर्यंतच्या कारवाईमध्ये ही कारवाई माेठी आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्हाभरात अवैध गुटखा विक्री जाेमात सुरू हाेती. पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी सहायक पाेलीस अधीक्षक निकेतन कदम यांना धाडी टाकण्याबाबत सूचना केल्या. दरम्यान, पाेलिसांचा माेठा फाैजफाटा घेऊन गंजगाेलाईतील एका व्यापाऱ्याच्या गाेदामावर शनिवारी सकाळी साडेसहा वाजता धाड मारली. यावेळी माेठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा हाती लागला आहे.
एजन्सीच्या नावे असलेल्या एका दुकानावर आणि त्याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या लातुरातील विविध ठिकाणच्या गाेदामांवर धाडी टाकल्या आहेत. या धाडसत्राची कारवाई सलग दाेन दिवस सुरू हाेती. हाती लागलेल्या गुटख्याची माेजदाद तब्बल ३६ तास केल्यानंतर अखेर १ काेटी २५ लाखांचा मुद्देमाल समाेर आला. या प्रकरणातील प्रेमनाथ तुकाराम माेरे आणि त्याचे सहकारी, शिवाजी माेहिते आणि एक सावकार फरार झाला आहे़ त्यांचा दाेन पाेलीस पथकाकडून शाेध घेतला जात आहे.
विविध ठिकाणी गाेदाम...
लातुरातील वर्दळीच्या ठिकाणी हे दुकान आहे़ दरम्यान, त्याने माेठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा करून ठेवल्याचे धाडीत समाेर आले. दाेन दिवसांच्या धाडसत्रात तब्बल सव्वाकाेटीचा गुटखा हाती लागल्याने पाेलीसही चक्रावले आहेत. एवढ्या माेठ्या प्रमाणात लातुरात साठविलेल्या गुटख्याचा थांगपत्ता संबंधित यंत्रणांना कसा काय लागला नाही? असा प्रश्न आता उपस्थित हाेत आहे.
कर्नाटकातून आला गुटखा !
महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या लातूर जिल्ह्यात कर्नाटकातून माेठ्या प्रमाणावर अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक हाेत असल्याचे समाेर येत आहे. राज्याची सीमा भेदून हा गुटखा निलंगा, उदगीर, अहमदपूरसह लातूर जिल्ह्यात आणला जाताे आणि ताे काही दुकानदारांना वितरित केला जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. यामध्ये माेठ्या गुटखा किंगचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे, त्यांच्यावरही पाेलिसांची करडी नजर असल्याचे सहायक पाेलीस अधीक्षक निकेतन कदम म्हणाले.