आशपाक पठाण, लातूर : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे पत्र्याच्या शेडमध्ये गुटखा निर्मिती करण्याच्या मशिनसह जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल औराद पोलीस व अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने गुरूवारी दुपारी जप्त केला आहे. याप्रकरणी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, विमल पान मसाला व त्याची पँकिंग औराद शहाजानी येथे केली जात असल्याची माहिती पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारला असता याठिकाणी गुटखा तयार करण्याच्या साहित्यासह विमल पान मसाल्याचे पाकिट, मशिनही ताब्यात घेण्यात आली. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने अधिकारी विठ्ठल लोंढे यांनी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अभिषेक कालिदास बिरादार, श्रीनिवास गणपतराव शिवणे (रा. औराद शहाजानी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने बंदी असलेला गुटखा, मशीन व इतर साहित्य असे एकुण जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे करीत आहेत.