राजकुमार जाेंधळे, लातूर : चाेरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दाेघांना लातुरातील कव्हा नाका परिसरात स्थागुशाच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्यांच्याकडून वाहनासह तब्बल १८ लाखांचा गुटखा जप्त केला असून, याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरात चाेरट्या मार्गाने वाहनातून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती खबऱ्याने पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांना दिली. या माहितीची खातरजमा करून, त्यांनी कारवाईचे आदेश दिले. या माहितीनुसार लातुरातील कव्हा नाका परिसरात स्थागुशाच्या पथकाने बुधवारी सापळा लावला. गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेत झाडाझडती घेतली असता, त्यात विविध कंपनीचा प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधित पानमसाला (किंमत ११ लाख ४१ हजार ८७२ रुपये) आणि गुन्ह्यातील स्काॅर्पिओ वाहन (किंमत सहा लाख रुपये) असा एकूण १७ लाख ४२ हजार ८७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी उमर इस्माईल शेख (वय ३४) आणि शेख आफताब मेहमूद (वय ३८ दाेघेही रा. खोरी गल्ली, लातूर) यांना अटक केली आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्ष डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. व्यंकटेश पल्लेवाड, राहुल सोनकांबळे, मोहन सुरवसे, नितीन कठारे, मनोज खोसे, राहुल कांबळे यांच्या पथकाने केली.