लातूर : शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी तसेच स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी वातावरण निर्माण व्हावे यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात आले होते. त्यामध्ये लातूर विभागात खाजगी शाळांतून ज्ञानप्रकाश बालविकास केंद्राने द्वितीय तर शासकीय शाळांत मांजरी जिल्हा परिषद शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. यशस्वी शाळांचा ५ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात आले होते. शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण निर्माण व्हावे हा या उपक्रमाचा उद्देश होता. विविध बाबींवर शाळांचे मूल्यांकन केंद्रस्तर, तालुकास्तर आणि जिल्हास्तरावर करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. शिक्षण विभागाच्या समितीने परीक्षण करून शाळांचे गुणांकन केले होते. यामध्ये लातूर विभागात खाजगी शाळांमधून ज्ञानप्रकाश बालविकास केंद्राने द्वितीय क्रमांक पटकाविला असून, शासकीय शाळांमधून मांजरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विभागात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रास विभागस्तरावरील ११ लाख आणि मांजरी जिल्हा परिषद शाळेस ७ लाख रुपयांचे पारितोषिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५ मार्च रोजी मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात वितरित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील यशस्वी शाळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी व जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव तथा उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, उपशिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर यांनी कौतुक केले आहे.
मूल्यांकनाद्वारे शाळांची केली निवड...मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाची लातूर विभागात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता. मूल्यांकनाद्वारे ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र आणि मांजरी जिल्हा परिषद शाळेची निवड करण्यात आली असल्याचे लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी सांगितले.
या बाबींचे केले मूल्यांकन...केंद्रप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली समितीने शाळांची तपासणी केली. यामध्ये शाळा इमारत, भौतिक सुविधा, गुणवत्ता, शाळेचे प्रांगण, शैक्षणिक विकास, सामाजिक सहभाग, माजी विद्यार्थी सहभाग, वृक्षारोपण, स्वच्छता मॉनिटर, क्रीडा स्पर्धात शाळांचे यश आदी बाबीचा समावेश असल्याचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी सांगितले.