लातूर : परतीच्या पावसाने जिल्ह्यात हाहाकार केला असून, निलंगा, देवणी, शिरुर अनंतपाळ, चाकूर आणि उदगीर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे़ जिल्ह्यातील ३७ महसुल मंडळात अतिवृष्टी झाली असून, सर्वाधिक पाऊस कासार बालकुंदा महसूल मंडळात १४५़०३ मि़मी़ एवढा झाला आहे़ औराद शहाजानी तसेच देवणी, बोरोळ, वलांडी, उदगीर, नागलगाव, मोघा, देवर्जन, तोंडार या महसूल मंडळांतही अतिवृष्टी झाली. या पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या बनिमी पाण्यात गेल्या आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून परतीचा पाऊस होत असून, मंगळवारी रात्री पावसाचा जोर वाढला असून, संततधार सुरू आहे. औराद शहाजानी परिसरातील चांदोरी, बोरसुरी, तगरखेडा, सावरी, सोनखेड, शेळकी, हालसी, लिंबाळा, मदनसुरी, वांजरखेडा शिवाराला नदीचे स्वरुप आले आहे. या परिसरातील पाणी ओढ्या-नाल्यांत घुसले असून, या पुरात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बनिमी वाहून गेल्याचे चित्र आहे. दरम्यान, चांदोरी येथील दत्ता व्यंकट गाडीकर यांच्या दोन एकरावरील बनीम पावसाच्या पाण्यात वाहून गेली.
निटूर परिसरालाही पावसाने झोडपले असून, अनेक वर्षांनंतर गावालगतचा तलाव भरला आहे. नागरसोगा, कासारशिरसी, उस्तुरी, कासार बालकुंदा, बेलकुंड परिसरातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. घरणी, मसलगा, देवर्जन, साकोळ तुडूंब भरले आहेत. रेणापूर, व्हटी, तिरु मध्यम प्रकल्प मात्र, ५० टक्यांच्या आसपास भरले आहेत़ तावरजा नदीला पाणी आले असले तरी प्रकल्प अद्याप भरलेला नाही़
बंधाऱ्यांचे दरवाजे उघडले...जिल्ह्यातील तेरणा, मांजरा नदीवर असलेल्या उच्चस्तरीय बंधाऱ्यांचे दरवाजे उघडले आहेत. तेरणा नदीवरील पाच उच्चस्तरीय बंधाऱ्याची दारे उघडून कर्नाटकात पाणी सोडून देण्यात आले आहे. मांजरा, तेरणा नदी संगमावरील वांजरखेडा, कोल्हापुरी बंधाऱ्याचे व सोनखेड येथील बंधाऱ्याची दारे उघडता येत नाहीत. त्यामुळे बॅकवॉटर जमा होऊन नदीकाठच्या शेकडो एकरात पाणी घुसले आहे. त्यामुळे या भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. शिवाय, या परिसरातील तीन बंधारे पाण्याखाली गेली आहेत.