रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पेठे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन झाले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षातील पीकविमा मिळाला नाही. तसेच यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मुगाचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट झाला आहे. नदी- नाल्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या पिकांची नासाडी झाली आहे. तसेच जमिनीची खरडण झाली आहे. त्यामुळे उसासह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी करीत हलगीनाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार अतुल जटाळे यांना देण्यात आले. निवेदनावर शिवाजीराव पेठे, ओमप्रकाश सारूळे यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा...
मागील वर्षात पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरित पीकविमा देण्यात यावा. यंदा खरीप हंगामातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चालू वर्षातील २५ टक्के पीकविमा रक्कम देण्यात यावी, भुईसपाट झालेल्या उसाला हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात यावी. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसल्याने ई-पीक पाहणी पूर्वीप्रमाणे करावी. शिरूर अनंतपाळ येथे १३२ केव्ही वीज वितरण कार्यालय सुरू करावे. शिवपूर येथे ३३ केव्ही उपकेंद्र मंजूर करावे. चालू बाकीदारांस ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.