शिरूर अनंतपाळ : येथील राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. महात्मा बसवेश्वर चौकात तर वाहने चालविणे कठीण झाले होते. त्यामुळे या राज्य मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावी, अशी मागणी करत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी उदगीररोडवरील कन्या शाळेपासून अतिक्रमणावर हातोडा मारण्यास झाली असून, महात्मा बसवेश्वर चौकापर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
शिरूर अनंतपाळ तालुका निर्मितीनंतर आरीमोड ते उदगीररोड या पाच किमी अंतरात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वाढली होती. त्यामुळे येथील बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे तत्कालीन अभियंता वसमतकर यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे हटविण्यात आली होती.परंतु त्यानंतर नऊ वर्षांत पुन्हा अतिक्रमणाचा जोर वाढला आणि आरीमोड ते उदगीररोड पुन्हा वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. शिवाय येथील महात्मा बसवेश्वर चौकात तर पायी फिरणेही कठीण झाले होते. त्यामुळे येथील अतिक्रमणे हटविण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून केली जात होती.
येथील अनंतपाळ बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने अतिक्रमणे हटविण्यासाठी उदगीररोड चौकात बापूराव देवंगरे, बी. व्ही. येरोळे, किशन इंलकर, वैजनाथ नाबदे, उमाकात देवंगरे, मुख्तार देशमुख, शेरसांडे, मुदाळे, यरमलवार आदींनी उपोषण सुरू केले होते. त्यामुळे उपविभागीय अभियंता सुधाकर पौळे, महेश मोकाशी यानी वारंवार नोटिसा देत स्वत: होऊन अतिक्रमणे काढून घेण्यात यावी अशा सूचना दिल्या होत्या. अनेकांनी शेवटच्या क्षणापर्यंत अतिक्रमणे काढली नव्हती. त्यामुळे बांधकाम उपविभाग, तहसील कार्यालय, नगरपंचायत आणि यांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारपासून उदगीररोडवरील कन्या शाळेपासून अतिक्रमणावर हातोडा मारण्यास सुरुवात केली आहे.
रस्त्याच्या मध्यापासून ५० फुटावर रेषा...शहरातून गेलेल्या आरीमोड ते उदगीररोड या पाच किमी अंतरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी उपविभागीय कार्यालयाच्यावतीने रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस ५० फुटावर रेषा मारून ५० फुटाच्या आतील सर्व अतिक्रमणे हटविण्यात येत असल्याचे उपविभागीय अभियंता सुधाकर पौळे, कनिष्ठ अभियंता महेश मोकाशी यांनी सांगितले. दरम्यान, दोन दिवसात पाच किमी अंतरातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई पूर्ण होईल, असेही सांगण्यात आले.