चाकूर : विकासाच्या माध्यमातून तालुका पातळीवरून राज्य पातळीपर्यंत अलगरवाडी गावाने डंका वाजविला. अलगरवाडी गावाची ओळख या विकासाच्या माध्यमातून सर्वदूरपर्यंत करून दिली. दरम्यान, लातूर ते नांदेड महामार्गावर असलेल्या या गावापासून रत्नागिरी ते बोरीबुटी या राष्ट्रीय महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. या राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आला असून, अलगरवाडी गाव दर्शविणारे फलकाच्या जागी चक्क हणमंतवाडी गावाचा फलक बसविण्यात आल्याने प्रवाशांची दिशाभूल होत आहे.
चाकूरपासून तीन किलोमीटर अंतरावर चारालिंब पाटी ही अनेक दकशांपासूनची ओळख आहे. येथे उतरून अवघ्या दोन-तीन फर्लांग अंतरावर अलगरवाडी हे गाव आहे. ग्रामस्वच्छता अभियानात तालुका पातळीपासून ते राज्यस्तरावर अलगरवाडी गावाचे नाव सर्वदूर परिचित झाले आहे. मात्र, रत्नागिरी ते बोरीबुटी या राष्ट्रीय महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, अलगरवाडी गावाच्या नावाचा फलक बसविण्यात आला नाही. चार लिंब पाटीही अनेक दशकांपासून आहे. त्याच्याही नावाचा फलक बसविण्यात आला नाही. त्यामुळे या अलगरवाडी गावात जाण्यासाठी प्रवासी वर्गाला हायवेवर चकरा माराव्या लागत आहेत.
अलगरवाडी गावाच्या शोधात अनेक जण ८ ते १० किलोमीटरचा फेरा मारतात. हणमंतवाडी गावात जाणारे प्रवाशी फलक पाहून थेट अलगरवाडी गावात जातात. तेथे विचारपूस करून पुन्हा परतीचा प्रवास सुरू होतो. नाव बदलून हणमंतवाडी नावाचा फलक गावच्या दोन्ही बाजूच्या दिशेने लावण्यात आला असल्यामुळे बाहेर गावाहून ये-जा करणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अलगरवाडीच्या ग्रामस्थांनी अनेकदा ही बाब राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे. त्यावर काही एक उपाययोजना करण्यात आली नाही. अलगरवाडी गावाचा फलक रस्त्याच्या दुतर्फा बसविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विनाकारण आठ ते दहा किमीची चक्कर...रत्नागिरी ते बोरीबुटी या राष्ट्रीय महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, अलगरवाडी गावाच्या नावाचा फलक बसविण्यात आला नाही. चार लिंब पाटीही अनेक दशकांपासून आहे. त्याच्याही नावाचा फलक बसविण्यात आला नाही. त्यामुळे या अलगरवाडी गावात जाण्यासाठी प्रवासी वर्गाला हायवेवर चकरा माराव्या लागत आहेत. याकडे महामार्ग प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.