लातूर : हर हर महादेव जयघोषात लातुरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेस शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. मध्यरात्री १२ वाजता गवळी समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला. सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मंदिर परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. मध्यरात्रीपासूनच हजारो भक्तांनी श्री सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी गर्दी केली.
लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर यात्रा मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. मागील दोन वर्षात कोविडमुळे यात्रा महोत्सव होऊ शकला नव्हता. यंदा भाविक आणि नागरिकांच्या सहभागातून यात्रा महोत्सव होत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी अभिषेकानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी १० वाजता अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानची सपत्निक महापूजा केली. उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, प्रशासक सचिन जांबुतकर, तहसीलदार स्वप्निल पवार, विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले, श्रीनिवास लाहोटी, नरेश पंड्या, बाबासाहेब कोरे, प्रदीप पाटील खंडापूरकर आदींची यावेळी उपस्थिती होती. अप्पर जिल्हाधिकारी लोखंडे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.
मध्यरात्रीपासून देवस्थानचा परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत होती. देवस्थानच्या वतीने दर्शनासाठी भक्तांना अडचणी येऊ नयेत याची काळजी घेतली जात असून, गर्दी नियंत्रित करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. गर्दीमध्ये अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पूजा साहित्याचे स्टॉल रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आले आहेत. यंदाच्या यात्रेत बच्चे कंपनीसाठी आनंदनगरीचे आकर्षण असणार आहे. मनोरंजनाच्या साधनांकडे लहान मुले आणि तरुण आकर्षित होत आहेत.
मानाच्या काठ्यांची मिरवणूक...श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त मानाच्या काठ्यांची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. माजी महापौर विक्रम गोजमगुंडे यांच्या निवासस्थानी मानाच्या काठ्यांचे पूजन केले जाते. दुपारी १ वाजता हा पूजाविधी झाला. विक्रम गोजमगुंडे, विशाल गोजमगुंडे, विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह परिवारातील सदस्यांनी काठ्यांचे पूजन केले. त्यानंतर गौरीशंकर मंदिरापासून काठ्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. वाद्यांच्या गजरात ही शोभायात्रा सायंकाळी देवस्थान परिसरात दाखल झाली.