लातूर : रेणापूर तालुक्यातील हरवाडीतील माजी सरपंचाने गावचा पाणीपुरवठा बंद केल्याने अंघोळीसाठीही पाणी मिळेनासे झाले आहे. गावास पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा, या मागणीसाठी विद्यमान उपसरपंचासह नागरिकांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
हरवाडी हे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी याेजना राबविण्यात आली आहे. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा होत होता. दरम्यान, माजी सरपंचाने संपूर्ण गावचा पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना घागरभर पाण्यासाठीही भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात चार दिवसांपूर्वी प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
गावचा पाणीपुरवठा गेल्या १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही समस्या सोडवावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनात उपसरपंच चंद्रकांत माने, ग्रामपंचायत सदस्य किरण इंगळे, नितीन माने, कल्याण हरवाडीकर, ग्यानदेव कातपुरे, अच्युत माने, बंकट कातपुरे, अशोक गंगथडे, हरिश्चंद्र इंगळे, निखित ताडके, सिध्देश्वर ढोरमारे आदी सहभागी झाले आहेत.