राजकुमार जाेंधळे, निलंगा (जि. लातूर) : सोमवारच्या भूकंपानंतर बुधवारी रात्री पुन्हा हासोरीसह उस्तुरी आणि हारीजवळगा गावालाही भूकंपाचा धक्का बसला. ८:४९ आणि ८:५७ वाजता दोन धक्के बसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, तर बुधवारी रात्री ८:५७ वाजता बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याची नाेंद १.६ रिश्टर स्केल नाेंदवली गेली आहे, असे लातूर येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले.
साेमवार, २ ऑक्टोबर राेजी दिवभरात हासोरी येथे भूकंपाचे तीन धक्के बसले. या धक्क्यातून ग्रामस्थ सावरतात तोच बुधवारी रात्री ८:३० ते ९:०० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. आधीच भयभीत झालेले ग्रामस्थ अंथरुणाला पाठ टेकवताच झालेल्या धक्क्यामुळे जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळ काढत रस्त्यावर आले, तर जनावरे, खुराड्यातली कोंबड्या सैरावैरा धावू लागल्या. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात भूकंपाची मालिकाच सुरू होती. तेव्हाही रस्त्यावर धरणे, आंदोलन, उपोषण करून ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले हाेते. गावच्या पुनर्वसनाची मागणी त्यांनी लावून धरली हाेती. शासनाने तातडीने तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ९ कोटींचा निधी जाहीर केला. मात्र, केवळ ३ कोटी २० लाखच मंजूर झाल्याचे पत्र ग्रामस्थांच्या हाती पडले. अद्यापही हा निधी ग्रामस्थांच्या पदरी पडला नसल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली बरमदे यांनी सांगितले.
ताडपत्री शेडला ग्रामस्थांचा विराेध
हासाेरी ग्रामस्थांनी पत्रा, फायबर शेड मिळावे अशी मागणी केली हाेती. मात्र, शासनाकडून ताडपत्रीचे शेड मंजूर झाले असल्याने ग्रामस्थांनी या ताडपत्री शेडला विरोध केला. अद्याप निधी मिळाला नसल्याचे सरपंच अश्विनी बिराजदार यांनी सांगितले.
शासनाने मदत करण्याची मागणी
निलंगा शहरापासून २५ किलोमीटरवर असलेल्या हासाेरी गावाला शासनाकडून अद्याप कुठलीही मदत, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची मदत मिळाली नाही. गाव रस्त्यावर असून, शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी सचिन आरीकर, किरण बरमदे, प्रेमनाथ बरमदे, चंदू पाटील यांनी केली आहे.