लातूर : प्रवासी म्हणून आलेल्या एकाने आटाेचालकाला रस्त्यातच मारहाण करत ऑटाे, माेबाइल पळविल्याची घटना २७ फेब्रुवारी राेजी घडली हाेती. दरम्यान, याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आराेपीला अवघ्या दाेन तासात जेरबंद केले आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील बार्शी रोडवर थांबलेल्या एका ऑटोचालकास एका प्रवाशाने बर्दापूर येथे भाड्याने जायचे आहे, असे सांगितले. दरम्यान, ऑटाेत बसलेल्या प्रवाशाला घेऊन ताे चालक निघाला. काही अंतरावर रस्त्यात ऑटाे थांबवून चालकास मारहाण केली. यावेळी ऑटो व मोबाइल पळविला. ही घटना २७ फेब्रुवारी राेजी घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात अज्ञाताविराेधात २८ फेब्रुवारी राेजी मध्यरात्री गुन्हा दाखल केला होता. एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांच्या पथकाने तातडीने आराेपीचा शाेध सुरू केला.
फिर्यादीच्या जबाब, वर्णनावरून ठाण्याच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची चाचपणी केली. पथकाला मिळालेल्या माहितीवरून संशयित म्हणून अक्षय प्रभाकर कणसे (वय २३, रा. वाल्मिकीनगर, लातूर) याला अवघ्या दोन तासांत राहत्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. अधिक चाैकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ऑटाे व माेबाइल असा एकूण २ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलिस निरीक्षक गोरख दिवे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप कामत, पोलिस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे, संदीप कराड, अतुल डाके, अंमलदार भीमराव बेल्लाळे, गोविंद चामे, भागवत मुळे यांनी केली आहे. सहायक फाैजदार मुळे तपास करत आहेत.
विविध ठाण्यात सात गुन्हे दाखल...एमआयडीसी पाेलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. अक्षय प्रभाकर कणसे याच्याविराेधात जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांमध्ये मालमत्ता चोरीसह इतर सात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.