धाराशिव येथून चुलत मेहुण्याच्या लग्नासाठी सासरवाडीत आलेल्या एका जावयाचा मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याची घटना औसा तालुक्यातील एकंबी तांड्यावर रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात नातेवाईकांविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यत सुरू हाेती.
पाेलिसांनी सांगितले, मृत जावई अंकुश विनायक पवार (वय ३० रा. धाराशिव) हे रविवारी सकाळी एकंबी तांडा येथे मेहुण्याच्या लग्नासाठी कुटुंबासह आले हाेते. दुपारी १२:४५ वाजता विवाहापूर्वीच सासऱ्याच्या शेजाऱ्यासोबत मेहुणीला बोलण्याबराेबरच दारासमोर वाहन का थांबविले, या कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी जावई अंकुश पवार यांना शेजाऱ्यांनी काठी, लोखंडी रॉडने डोक्यात जबर मारहाण केली. त्यात ते गंभीर जमखी झाले. त्यांना लातूरला उपचारासाठी घेऊन जाताना वाटेतच मृत्यू झाला. लातुरातील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
तांड्यावर तणाव; फाैजफाटा दाखल... - तू मेहुणीबद्दल माझ्या मुलाकडे का विचारणा केली? यासह इतर कारणावरून जावयाचा केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. घटनेनंतर लग्नासाठी जमलेल्या पाहुण्यासह तांड्यावर काही वेळ तणावाचे वातावरण हाेते. दरम्यान, पोलिसांचा फाैजफाटा दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर नियाेजित विवाह साेहळा पार पडला, अशी माहिती सपोनि. राहुलकुमार भोळ यांनी दिली.