वलांडी (लातूर ) : देवणी तालुक्यातील धनेगाव येथे मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमधून पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी जीप चालकाविरोधात देवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, एका विवाहसाठी औसा तालुक्यातील सेलू येथील पाहुणे धनेगाव येथे खाजगी प्रवासी जीपमधून (एम.एच. ४४ बी. १९४४) येते होते. यावेळी आईच्या कुशीत असलेली प्रतीक्षा राम बंडगर (वय अडीच वर्षे) ही जीपमधून खाली पडली. यात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. चिमुकलीच्या या आकस्मित मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करून जीप चालकाविरोधात देवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गौड करीत आहेत.
बस थांबा नाही, अवैध प्रवासी वाहतूक वाढली...निलंगा-उदगीर राज्यमार्गावर बहुतांश बसगाड्या थांबत नसल्याने प्रवासी अवैध वाहतुकीचा आधार घेत आहेत. शिवाय पोलिस या अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा घटना घडत आहेत. निलंगा व उदगीर आगाराने बसच्या चालक व वाहकांना सूचना करून बस थांब्यावर बसेस थांबवण्याच्या सक्त ताकीद द्यावी अन्यथा प्रवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.