लातूर : निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल, वडगाव, आनंदवाडी, शेडोळ, तुपडी, हाडगा गावासह परिसरात वादळी वाऱ्यासह शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. अवघ्या चाळीस मिनिटात ओढे-नाल्यांना पूर आला.
निलंगा तालुक्यात दोन दिवसांपासून वादळीवाऱ्यासह पाऊस पडत असून, ताे पेरणीलायक झाला आहे. त्याचबराेबर वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसानही झाले आहे. गत आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला हाेता, ताे अद्यापही सुरळीत झाला नाही. तर शिवणी कोतल ते आनंदवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पूल नसल्याने दोन गावाचा संपर्क गेल्या चार तासांपासून तुटला आहे. या मार्गावरील वाहतूक बंद आहे. बऱ्याच दिवसांपासून या रस्त्याबराेबरच पुलाची मागणी ग्रामस्थ करत आहेत. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नाही. वादळी वाऱ्याने उमरगा - हाडगा येथील मेन रोडवर झाड पडल्याने हा मार्ग तीन तासांपेक्षा अधिक वेळ बंद हाेता. या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
काेतल शिवणी परिसराला मुसळधार पावसाने झाेडपले...दोन दिवसांपासून शिवणी कोतल परिसराला मुसळधार पावसाने झाेडपले आहे. ढगफुटीसदृश पावसाने नदी-नाले-ओढ्यांना पूर आला आहे. या पावसाने पाण्याचा प्रश्न सध्यातरी मिटला आहे. शिवणी कोतल ते आनंदवाडी जाण्यासाठी रस्ता दुरूस्त नसल्याने, ओढ्यावर पूल नसल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.