लातूर/जळकोट : जळकोट तालुक्यात गुरुवारी रात्री अतिवृष्टीने पिकांसह शेतातील मातीही वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाले. रावणकोळा, मरसांगवी, अतनूर येथील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. तिरू नदीला पूर आल्याने नजीकच्या गावांचा ८ ते १० तास संपर्क तुटला होता; तसेच रावजी तांडा-सुल्लाळी-मेघा तांडा रस्त्यावरील पूल वाहून गेला.
जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस होत आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही भागांत गुरुवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. जळकोट तालुक्यात जवळपास पाच तास पाऊस होऊन अतिवृष्टी झाली. तालुक्यातील रावणकोळा, हळद वाढवणा, माळहिप्परगा, अतनूर परिसरातील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत; तसेच रावणकोळा येथील बळीराम डोंगरगावे, व्यंकट बेळकोणे, पिराजी बेळकोणे, दाऊद पटेल यांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य भिजले. शकील शेख, काफिया शेख, पांडुरंग वाघमारे यांच्या शेतातील ३०० ट्रीप टाकलेली काळी माती वाहून गेली आहे. त्याचबरोबर शंकरराव पाटील यांच्या शेतातील माती वाहून गेली.
मरसांगवीचा संपर्क तुटला...तालुक्यातून वाहणाऱ्या तिरू नदीला पूर आल्याने मरसांगवी व परिसरातील गावांना जोडणाऱ्या मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा ८ ते १० तास संपर्क तुटला होता. तसेच काही ठिकाणचे रस्तेही उखडून गेले आहेत. त्याचबरोबर पावसामुळे गावातील काही घरांची पडझड झाली. नदीकाठच्या दिलदार पटेल, मैनोद्दीन बिरादार, सरदार जमादार, सलीम शेख, जाफर शेख यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले; तसेच नदीकाठच्या अन्य जवळपास २०० शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.
तलावाचा बांध फुटल्याने दोन म्हशी दगावल्या...अतिवृष्टीमुळे अतनूर येथील पाझर तलाव क्र. १ च्या सांडव्याचा बांध फुटल्याने तलावाखालील शेतकरी विश्वनाथ सोमुसे यांच्या दोन म्हशी वाहून जाऊन दगावल्या. या म्हशींची किंमत जवळपास सव्वालाख आहे; तसेच परिसरातील शेतातील पिकांसह जमिनीची खरडण झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश...नुकसानीची माहिती मिळताच क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि ते शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश दिले आहेत. दरम्यान, तहसीलदार सुरेखा स्वामी, मंडळ अधिकारी पन्हाळे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, ग्रामसेवक श्याम पाटील, तलाठी सूरज भिसे व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावांना भेटी देऊन पाहणी केली.