जळकोट तालुक्यात मृगाच्या प्रारंभी दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला होता. त्यामुळे तालुक्यातील जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यास सुरुवात करून त्या पूर्ण केल्या होत्या. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे. दरम्यान, पिके उगवली. कोवळ्या पिकांना पावसाची गरज असताना पावसाने उघडीप दिली. गेल्या १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली होती. दुबार पेरणी करावी लागणार की अशी धास्ती होती. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी आणि रात्री शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाला. हवामान केंद्रावर ५७ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
या पावसामुळे ओढे खळखळू लागले आहेत. तसेच पाझर तलावातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. त्याचबरोबर उर्वरित पेरणीच्या कामास वेग येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.