ऑनलाइन लोकमत
अहमदपूर / रेणापूर, दि. १ - अतिवृष्टी झाल्याने अहमदपुरातील मन्याड व झराडी तसेच रेणापुरातील रेणा नदीस शनिवारी पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे मावलगाव (ता. अहमदपूर) चे १० तर कामखेड्यातील २१ शेतकरी अडकले आहेत. दरम्यान, मावलगावच्या शेतक-यांना पुराबाहेर काढण्यासाठी प्रशासनाने सायंकाळी हेलिकॉप्टर मागविले आहे.
अहमदपूर तालुक्यातील मन्याड व झराडी या दोन नद्यांचा संगम तांबटसांगवी येथे होतो. या संगमावर मावलगाव येथील शेतकरी शेतातच राहतात. शनिवारी या दोन्ही नद्यांना पूर आल्याने त्यात बालासाहेब भदाडे, विजय भदाडे, भाग्यश्री भदाडे, शाम भदाडे, गुलाब शेख, मन्नाबाई शेख, कौसर रईस शेख, चिंगू रईस शेख, अस्लम शेख, असद शेख हे अडकले आहेत. पुराच्या पाण्यामुळे काहीजण घराच्या छतावर तर काही जण झाडावर बसले आहेत.
दरम्यान, पुरात अडकलेल्या या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना पाचारण केले होते. त्यांनी बोटीद्वारे या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ऐनवेळी बोटीमध्ये बिघाड झाल्याने हा प्रयत्न फसला. त्यामुळे सायंकाळी मदतीसाठी हेलिकॉप्टरची मागणी प्रशासनाने केली आहे. तसेच एन.डी.आर.एस. जवानांनाही बोलाविण्यात आले आहे.
रात्री ७.२० वाजेपर्यंत हे जवान पोहोचले नव्हते. घटनास्थळाकडे अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदेकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, तहसीलदार प्रवीण मेंगशेट्टे यांनी धाव घेऊन पाहणी केली आहे.
रेणापूर तालुक्यातील रेणा नदीस पूर आल्याने नदीपात्राशेजारी असलेल्या कामखेडा गावातील २१ नागरिक पाण्यात अडकले आहेत. त्यामुळे ते घरावरील पत्र्यावर बसले आहेत.
हेलिकॉप्टर, एनडीआरएसच्या जवानांना पाचारण
पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बीदर येथून हेलिकॉप्टर व एनडीआरएसच्या जवानांना बोलाविण्यात आले आहे. लवकरच हे नागरिक सुखरुप बाहेर पडतील, असा विश्वास तहसीलदार प्रवीण मेंगशेट्टे यांनी व्यक्त केला.
साडेचार तासानंतर सुटका...
चाकूर तालुक्यातील उकाचीवाडी परिसरातून वाहणा-या नदीला पूर आल्याने गावातील पाच तरुण अडकले होते. दरम्यान, एका झाडाचा आश्रय घेत तब्बल साडेचार तास थांबले. पाणी ओसरताच ते सुखरुप बाहेर आले आहेत.