उदगीर : ‘रामराम...शिव शरणार्थ. नमस्कार उदगीर...वालेकुम सलाम....आदाब..’ उदगीरकरांच्या कानावर येत्या काही दिवसात रोजची सकाळ रेडिओ जॉकी-आरजेच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. त्याला कारण आहे तीन एफएम सुरू होण्याचे. उदगीरच्या लयबद्ध भाषेला या एफएमने आता नवसंजीवनी मिळेल. शिवाय शेजारील कर्नाटक, तेलंगणातील शब्दांची पण सरमिसळ कानोकानी गुंजत राहील. याचमुळे अनेकांच्या कानात, गृहिणींच्या स्वयंपाकगृहात एफएफ एके एफएमचेच मनोरंजन सुरू असेल.
केंद्र सरकारने राज्यात ३६, मराठवाड्यात १० आणि लातूर जिल्ह्यात ७ त्यात सीमावर्ती भागातील उदगीर येथे ३ तीन खासगी एफएम (फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. एफएमने मनोरंजन तर होईलच शिवाय शिक्षण, आरोग्य, कृषीसह स्थानिक कलावंत, भाषेतील वेगळेपण एफएमचे वैशिष्ट्य असेल. उदगीर व्यावसायिक दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकसित झालेय. मुंबई-पुण्यासह देश विदेशात उदगीरकरांनी ख्याती मिळवली आहे. ब्रॉडगेज मार्गामुळे कनेक्टिव्हिटी वाढली आहे. व्यापारातून कोट्यवधींची उलाढाल करणारी बाजारपेठ म्हणून वेगळी ओळख आहे. शैक्षणिक दृष्टीनेही एक पाऊल पुढेच आहे. खासगी मोठमोठ्या नामांकित क्लासेसनी पण इथे व्यावसायिक प्रगती साधली आहे. हॉटेलिंग क्षेत्रातही चवींनी जिभेवर हुकमत गाजवली आहे. या सर्व जमेच्या बाजू खासगी एफएमसाठी उपयोगी ठरणार आहेत.
शॉपिंग, हॉटेलिंग, एज्युकेशनल आणि बरेच काही...उदगीरची भोकरी डाळ...कच्चा चिवडा.. गोल्डन चहा.. असे बरेच काही लज्जत वाढविणारे पदार्थ, एज्युकेशनल क्षेत्रातील प्रगती, शॉपिंगसाठी समृद्ध असलेली बाजारपेठ... यासह सर्व बदललेले उदगीर एफएमसाठी नवसंजीवनीच ठरेल. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या संकल्पनेतून उदगीरच्या विकासाची घोडदौड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उदगीर येथे नुकतेच सुरू झाल्यामुळे उदगीरची ओळख एमएच ५५ अशी झाली आहे. पर्यटनातही उदगीरने भरारी घेतली आहे. उदगीरचा ऐतिहासिक किल्ला व हत्तीबेट पर्यटनस्थळ या दोन महत्त्वाच्या पर्यटनस्थळाची एफएम ख्याती वाढविणार आहे. शिवाय एफएममुळे उदगीरची नवी ओळख होण्यास मोठी मदत होणार आहे.