लातूर : नापिकी, कर्जबाजारीपणा, कर्जाची परतफेड या तीन प्रमुख कारणांना वैतागून काही शेतकरी आपली जीवनयात्रा संपवितात. अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेने नवा उपक्रम हाती घेतला आहे. सेस फंडातून एकूण ५६५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास खरीपासाठी मोफत सोयाबीन बियाणे देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचा हा निर्णय राज्यासाठी पथदर्शी ठरणारा आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हा कणा आहे. मात्र, नापिकी, कर्जाच्या चिंतेने नैराश्यग्रस्त काही शेतकरी टाेकाचे पाऊल उचलत आत्महत्या करीत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देऊन त्यांनी पुन्हा उभारी घ्यावी म्हणून शासनाच्या वतीने विविध योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जि.प.चे सीईओ अभिनव गाेयल यांच्या सूचनेवरुन जिल्हा परिषदेने योजनांचा लाभ देण्याबरोबरच सामाजिक बांधलिकी जोपासत यंदाच्या खरीप हंगामासाठी मोफत सोयाबीन बियाणे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
५६५ कुटुंबांना अनुदानावर बियाणे...नापिकी व कर्जाला कंटाळून जिल्ह्यात सन २००४ ते २०२३ या कालावधीत एकूण ५६५ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शंभर टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पंचायत समितीस्तरावरुन कृषी केंद्रांना या शेतकरी कुटुंबांच्या याद्याही देण्यात आल्या आहेत.
१५ लाखांचे बियाणे वितरण...महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने उत्पादित केलेले सोयाबीनचे बियाणे ५६५ शेतकरी कुटुंबांना दिले जाणार आहे. सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून जिल्हा परिषदेने जवळपास १५ लाख रुपयांचा निधी बियाणासाठी उपलब्ध करुन दिला आहे.
औश्यात सर्वाधिक आत्महत्या...जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या ह्या औसा तालुक्यात झाल्या असून १३३ अशी संख्या आहे. लातूर तालुका- ७४, निलंगा- ८५, रेणापूर- ४८, शिरुर अनंतपाळ २३, उदगीर- ३४, अहमदपूर- ६७, चाकूर- ४३, देवणी- ४०, जळकोट तालुक्यातील १८ अशा एकूण ५६५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास प्रत्येकी एक बॅगप्रमाणे सोयाबीन बियाणांचे वितरण होणार आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे बळीकटीकरण...जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या सूचनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी विविध शासन योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे. आता या कुटुंबांना सोयाबीन बियाणाची प्रत्येकी एक बॅग मोफत देण्यात येणार आहे.- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी.