लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षेस मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात ९२ केेंद्रावर ही परीक्षा होणार असून, ३५ हजार ९०६ विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. या परीक्षेसाठी १७ परीरक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, पाच भरारी पथके राहणार आहेत. यामध्ये एक महिलांचे पथकही तैनात राहणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.२१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे.
जिल्ह्यात ३५ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नाेंदणी केली आहे. त्यानुसार मंगळवारी पहिला पेपर होणार आहे. बारावीसाठी लातूर तालुक्यात ३२, औस्ा ८, निलंगा ९, शिरुर अनंतपाळ २, देवणी ४, जळकोट ३, उदगीर १२, चाकूर ६, अहमदपूर ११ तर रेणापूर तालुक्यात ५ असे एकूण ९२ केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी, यासाठी प्रत्येक केंद्रावर महसूलच्या पथक परीक्षेच्या एक तासापुर्वीच हजर राहणार आहे. प्रत्येक परीक्षार्थ्यांची झडती घेतली जाणार असून, केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटरही बंद ठेवण्याच्या सुचना आहेत. परीक्षा केंद्राच्या ५० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना परवानगी नसून, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जि.प. सीईओ परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. दरम्यान, इंग्रजी, विज्ञान आणि गणित या विषयांच्या पेपरच्या दिवशी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पाच भरारी पथकांची नियुक्ती...बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महिलांचे स्वतंत्र पथक राहणार आहे. सोबतच महसूल, शिक्षण आणि पोलीसांचे पथक विविध केंद्रावर पाहणी करणार आहेत. गैरप्रकार आढळल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई होणार आहे.
परीक्षेसाठी १० मिनिटे जास्त...दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या दहा मिनिटांपुर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्याची पद्धत बंद केली होती. मात्र, परीक्षेच्या वेळेत दहा मिनिटांनी वाढ करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी बारावीचा पहिला पेपर होणार आहे.
विद्यार्थ्यांनी काय करावे...विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपुर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहचावे. सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता उपस्थित रहावे. त्यानंतर परीक्षा दालनात सकाळी ११ तसेच दुपारी ३ वाजता प्रश्नपत्रिकेच्या वितरण व लेखनास प्रारंभ होणार आहे. तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे.