ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 2 - "तुम्हाला सिनेमात काम देतो, हिरोईन करतो", असे म्हणून काही दिवस शूटिंग केल्याचे नाटक करून तथाकथित चित्रपट निर्माता-दिग्दर्शक असलेल्या दोघा भावांनी लातूर येथील दोन मुलींचे अपहरण केल्याची तक्रार आईने दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी कथित निर्माता-दिग्दर्शक असलेल्या दोन सख्ख्या भावांना तसेच अपहरण झालेल्या दोन्ही मुलींना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेले निर्माता - दिग्दर्शक हे सख्खे भाऊ आहेत. लातूर शहरातील रेणुकानगर भागातील दोन अल्पवयीन मुलींना चित्रपटात अभिनेत्रीचे काम देण्याचे आमिष रेणापूर तालुक्यातील मोहगाव (तळणी) येथील विजय खडके व राहुल खडके या सख्ख्या भावांनी दाखविले. दरम्यान, परळी येथे या मुलींना नेऊन काही दिवस चित्रिकरणही केले. त्यानंतर चित्रिकरणाचे काम थांबविले होते. रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तथाकथित निर्माते खडके बंधूंनी दोन्ही मुलींना बोलावून घेतले. कॉफी पिण्याच्या निमित्ताने बोलावून थेट मोहगाव येथे नेले. मुली घरी आल्या नसल्याने आई-वडिलांनी चौकशी केली. त्यावेळी तथाकथित निर्माते खडके बंधूंनी बोलावून घेतल्याचे समजले. दरम्यान, मुलींशी भ्रमणध्वनीवरून पालकांनी संपर्क साधला. त्यावरून त्यांना पळवून नेल्याचे लक्षात आले. त्यामुळे पालकांनी थेट एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तथाकथित निर्माते विजय खडके व राहुल खडके यांच्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी मोहगाव (तळणी) गाठून दोन मुलींसह सोमवारी पहाटे लातुरात आणले. या प्रकरणी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास खडके बंधूंविरुद्ध कलम ३६३, ३६६ (अ) ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवन यादव करीत आहेत.
हिरोइन बनवण्याचे आमिष दाखवून अपहरण करणारे अटकेत
By admin | Published: January 02, 2017 10:03 PM