अहमदपूर ( लातूर) : देशात उभारल्या जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर २०० वर्षे खड्डे पडणार नाहीत, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिली. दरम्यान, मराठवाड्यात १५ हजार कोटींच्या ४० राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू असून, नव्याने ७ हजार ५०० कोटींच्या कामांना मंजुरी दिल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या १०३ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, देशात आजपर्यंत १० लाख कोटींची कामे झाली असून, कुठेही भ्रष्टाचार झाला नाही. मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर असल्याने गोदावरी, दुधना, पूर्णा, मन्याड, मांजरा नदीवर जिथे पूल होईल, तिथे बंधारा बांधला जाईल. त्यामुळे एकूण महाराष्ट्रातील साडेपाच लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येईल. ३० नदीजोड प्रकल्प मंजूर झाले असून, गंगा-कावेरी नदी जोड प्रकल्पाद्वारे गोदावरी नदीचे जलसंवर्धन अभियान सुरू करू. दरम्यान, उसापासून इथेनॉल निर्मिती केल्यास शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील. उसापासून साखर तयार न करता थेट इथेनॉल उत्पादन झाले पाहिजे. शिवाय, इथेनॉलपासून बायो प्लास्टिक उत्पादन होणार आहे. तसेच इथेनॉलला अनुकूल फ्लेक्सी इंजीन येत आहे. जे पेट्रोल-डिझेल किंवा इथेनॉलवर चालू शकेल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.